पावसाळ्यात समुद्राच्या भरतीनुसार लोकल सेवा बदलणार

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पावसाळ्यात मुंबईच्या तिन्ही मार्गांपैकी मध्य रेल्वेची सेवा सर्वात जास्त विस्कळीत होते, याचा अनुभव आतापर्यंत प्रत्येक मुंबईकराला आलाच असेल. पण, या पावसाळ्यात असं होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेकडून उपाययोजना आणि पूर्वतयारी करण्यात येत आहे.

मेगाब्लॉकप्रमाणे चालवणार रेल्वेच्या फेऱ्या

मध्य रेल्वेने अतिवृष्टीत सावधगिरी बाळगण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा आणि ४.५ मीटरपेक्षा जास्त लाटा असतील त्या भरतीच्या दिवशी रविवार मेगाब्लॉकप्रमाणे कमी फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही नेमक्या दिवसांमध्ये नेहमीच्या १ हजार ७३२ फेऱ्यांपैकी केवळ १ हजार ३८४ फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच पावसाळ्यादरम्यान एकूण ३४८ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

या काळात असणार मुंबईत हायटाईड

यंदा मुंबईच्या समुद्रात पावसाळ्यात २६ वेळा मोठी भरती येणार आहे. ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांना ‘हायटाइड’ म्हटलं जात असून १३ जून ते १३ सप्टेंबर या काळात २६ वेळा मोठी भरती असून सर्वात मोठी भरती (४.९७ मीटर) १५ जुलै रोजी आहे. त्यामुळे भरतीच्या वेळा आणि दिवस लक्षात घेण्यासाठी कुलाबा वेधशाळेच्या सतत संपर्कात असणार असल्याचंही यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनील कुमार जैन यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यालयाला पाठवला प्रस्ताव

अतिवृष्टीचा अंदाज वेधशाळेने वर्तवला तर, त्या दिवशी रोजच्या १,७३२ फेऱ्यांऐवजी १,३८४ फेऱ्या चालवल्या जातील, असा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविल्याचंही सुनील कुमार जैन यांनी सांगितलं आहे.

प्रवासी संघटनांची नाराजी

पण, यापद्धतीने फेऱ्या रद्द करून लाखो प्रवाशांप्रमाणेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही त्याची झळ पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याऐवजी रेल्वेने नालेसफाईसारख्या गोष्टींवर लक्ष पुरवल्यास रुळांवर पाणी साचणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

रेल्वे तिकीटांवरही मराठीचा बोलबाला! स्थानकांची नावं मराठीत!

पुढील बातमी
इतर बातम्या