एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षअनिल परब यांनी केली.

राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले.

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल १७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास ५ रुपयांनी महागला आहे.

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळानं प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळानं कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती.


हेही वाचा

लालपरीचा प्रवास महागला! एसटीचे तिकिट दर 'इतक्या' रुपयांनी वाढले

महापालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या