Advertisement

महापालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांइतकाच बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेनं केली आहे.

महापालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त महापालिका व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बोनस दिला जातो. याच पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस द्यावा अशी मागणी केली जात आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांइतकाच बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेनं केली आहे. या संदर्भात बेस्ट कामगार सेनेची महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासमवेत बैठकही पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.

गतवर्षी मुंबई महापालिकेच्या १ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना दिवाळीला १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले होते; तर बेस्टच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपयांचे अनुदान मिळाले होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच गेल्या वर्षी मध्यस्थी केली होती.

यंदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांएवढेच बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे. याबाबत मागण्यांचे निवेदन महापौरांना देण्यात आल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.

महापालिका बेस्टला देत असलेल्या अनुदानात दरमहिन्याला ६० कोटी रुपयांची वाढ करून १५० कोटी रुपयांचे मासिक अनुदान द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता देण्यासाठी ७६ कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा