जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा

जेट एअरवेज कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. कर्जात वाढ झाल्यानं कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी २५ वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. मात्र, नरेश  यांनी राजीनामा दिल्यानं कंपनीचे सीईओ विनय दुबे यांच्यावर जेटची जबाबदारी असून आर्थिक संकटातून कंपनीला मुक्त करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना भावनिक पत्रदेखील लिहीले आहे. या पत्रात त्यांनी कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे नमूद केले आहे. 

४० विमाने जमिनीवरच

कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून राजीनामा देण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती. दरम्यान, कर्जाच्या विळख्यात अडकल्यानं जेटला नियमित उड्डाणे चालू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्याशिवाय, वैमानिक, पुरवठादार, बँका आणि कर्मचाऱ्यांचे पगार, हप्ते वेळेवर देणे जेटला शक्य होत नव्हते. तसंच, जेटची ४० विमाने जमिनीवरच उभी आहेत. 

८ हजार कोटींचे कर्ज

जेट एअरवेजवर सध्या २६ बँकांचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये खासगी आणि परदेशी बँकांचा समावेश आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, अलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जेटला कर्ज देण्यात आले होते. 


हेही वाचा -

पीएनबी, एसबीआय जेट एअरवेजला तारणार, देणार आपत्कालीन कर्ज

EXCLUSIVE : सात सिनेमांच्या सप्तरंगांसह 'भरत आला परत'


पुढील बातमी
इतर बातम्या