Advertisement

EXCLUSIVE : ७ सिनेमांच्या सप्तरंगांसह 'भरत आला परत'

बऱ्याच जणांना वाटलं होतं मी आऊट झालो, आता भरत संपला, पण तसं नाही. मला स्वत:ला रिफ्रेश करण्याची गरज होती. आज माझ्याकडं जी काही सिनेमांची यादी आहे, ती पाहिल्यावर सर्वजण हैराण होतील.

EXCLUSIVE : ७ सिनेमांच्या सप्तरंगांसह 'भरत आला परत'
SHARES

काही वर्षांपूर्वी मराठी सुपरस्टार भरत जाधवनं इतके सिनेमे केले की, त्याच्याशिवाय मराठी सिनेमा जणू अपूर्ण वाटू लागला होता. पण मागील पाच वर्षांपासून भरत रुपेरी पडद्यावरून गायबच झाला होता. एका मोठ्या ब्रेकनंतर भरत पुन्हा परत आला आहे. नुकतंच त्याचं 'मोरूची मावशी' हे नाटक रंगभूमीवर आलं असून, स्टार प्रवाहवर तो परीक्षकाच्या भूमिकेतही दिसणार आहे. याहीपेक्षा भरतच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर ही आहे की, भरतनं वेगवेगळ्या भूमिका असलेले सात सिनेमे साईन केले आहेत. 'मुंबई लाइव्ह'शी खास बातचीत करताना भरतनं ब्रेक घेण्याबाबत आणि आता पुनरागमन करण्याबाबत दिलखुलासपणं सांगितलं.


धोंडी चंप्या - एक प्रेमकथा

'कॅामेडी एक्सप्रेस' फेम लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्याकडे वळले आहेत. ज्ञानेश यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या 'धोंडी चंप्या - एक प्रेमकथा' या आगामी मराठी सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. या सिनेमात भरत जाधवसह वैभव मांगले, नितीन चव्हाण आणि सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं भेट झाली असता 'मुंबई लाइव्ह'शी संवाद साधताना भरतनं सांगितलं की, लवकरच वेगवेगळ्या धाटणीचं माझे सात सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


स्वत:साठी वेळ

याबाबत भरत सविस्तरपणं म्हणाला की, मागील पाच वर्षांपासून मी एकही सिनेमा केला नाही. कारण मला एक ब्रेक हवा होता. बाहेर कोणीही काहीही बोलो, पण हा ब्रेक मी स्वत:हून, स्वत:साठी घेतला होता. मला स्वत:साठी वेळ द्यायचा होता. या दरम्यान मी गप्प बसलेलो नाव्हतो. रंगभूमीवर नवनवीन नाटकं सुरूच होती. नुकतंच 'मोरूची मावशी' आलं आहे. 'पुन्हा सही रे सही' पाहण्यासाठी आजही प्रेक्षक गर्दी करत आहे. त्यामुळं माझं पहिलं प्रेम असलेल्या रंगभूमीवर काम सुरूच होतं. यातून मला स्वत:साठी वेळ देणं शक्य होतं.


नवा, फ्रेश भरत

आगामी सात सिनेमांमध्ये 'धोंडी चंप्या - एक प्रेमकथा' या सिनेमासोबतच भरतकडे आणखी सहा सिनेमे आहेत. याबाबत भरत म्हणाला की, आता कुठं पहिल्या सिनेमाचा मुहूर्त झाला आहे. इतक्यात मी इतर सहा सिनेमांची नावं सांगणार नाही, पण यातील प्रत्येक भूमिका आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी असेल हे ठामपणं सांगेन. त्यामुळं प्रेक्षकांना एक नवा, फ्रेश भरत पाहायला मिळेल. मला आता सरसकट एकाच प्रकारच्या भूमिका साकारायच्या नाहीत. तसं असतं तर पाच वर्षं थांबलोच नसतो.


सर्वजण हैराण होतील

अचानक सुरू असलेली करियरची गाडी थांबवून ब्रेक घेण्यामागील कारणाबाबत भरत म्हणाला की, तेच तेच रोल यायचे. त्यामुळं मला समाधान लाभत नव्हतं. यात 'शिक्षणाच्या आयचा घो', 'क्षणभर विश्रांती' आणि 'झिंग चिक झिंग'सारखे वेगळे रोलही होते. पण स्वत:वर असलेल्या विश्वासामुळं ब्रेक घेतला होता. त्यासाठी थांबलो होतो. आता मी सुपरवर्क करून परतलो आहे. बऱ्याच जणांना वाटलं होतं मी आऊट झालो, आता भरत संपला, पण तसं नाही. मला स्वत:ला रिफ्रेश करण्याची गरज होती. आज माझ्याकडं जी काही सिनेमांची यादी आहे, ती पाहिल्यावर सर्वजण हैराण होतील. लवकरच इतर सिनेमांचीही अनाऊंसमेंट करण्यात येईल.


नाटकांपर्यंतच मजल

सिनेसृष्टीतून इन-आऊट होण्याबाबत मत व्यक्त करताना भरत म्हणाला की, आऊट-इन होणं हे आपल्या हातात नसतं, पण मी स्वत:हून ब्रेक घेतला होता. त्यामुळं मला भीती नव्हती. या दरम्यान खूप निरीक्षण केलं. आपल्याकडं एकाच प्रकारच्या सिनेमांची लाट असते. त्या लाटेत आपल्याला वाहू द्यायचं नव्हतं. आता पुन्हा नवनवीन विषय येत आहेत. या पाच वर्षांदरम्यान बरेच बदल झाले, जे मराठी सिनेसृष्टीसाठी खूप फायदेशीर ठरणारे आहेत. होम प्रॅाडक्शनमध्ये सिनेमांची निर्मिती करण्याचा सध्या तरी विचार नाही. सध्या केवळ नाटकांपर्यंतच मजल मारत आहे. सिनेमांचा आवाका खूप मोठा असतो. 


वडिलांची व्यक्तिरेखा

'धोंडी चंप्या - एक प्रेमकथा' या सिनेमातही भरत एका वेगळ्याच रूपात समोर येणार आहे. याबाबत भरत म्हणाला की, ज्ञानेशसोबत मी यापूर्वीही काम केलं आहे. त्याच्या 'गोलमाल' या मराठी सिनेमातील भूमिकांसाठी प्रेक्षक आजही माझी आठवण काढतात. त्यामुळं त्यानं जेव्हा मला या सिनेमाबाबत विचारलं तेव्हा नकार द्यायला वावच नव्हता, पण कथा ऐकल्यावर मी या सिनेमाच्या संहितेच्या प्रेमातच पडलो. यात मी एका तरुण मुलाच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'लागीरं झालं जी' फेम नितीन चव्हाण या सिनेमात माझ्या मुलाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा एक म्हैस आणि रेड्याला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली आहे. नातेसंबंध आणि प्रेम यांची अनोखी कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.


वजन घटवावं लागलं

रुपेरी पडद्यावर विविधांगी भूमिका घेऊन येणारा भरत सध्या रंगभूमीवर 'मोरूची मावशी' बनून वावरतो आहे. याबाबत भरत म्हणाला की, विजूमामांसाठी मला 'मोरूची मावशी' हे नाटक करायचं होतं. विजूमामा माझ्या खूपच जवळचे होते. मला मोठ्या भावासारखे होते. त्यांची आठवण म्हणून मी 'मोरूची मावशी' करण्याचं धाडस केलं. आता मागणी वाढल्यानं सगळीकडं या नाटकाचे प्रयोग करण्याचं आव्हान आहे. स्वत:ला मोरूच्या मावशीच्या रूपात सादर करण्यासाठी मला वजनही घटवावं लागलं. पूर्वी ८५ किलो वजन होतं. ते आता ७६ झालं आहे.हेही वाचा -

ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव'
संबंधित विषय