पश्चिम रेल्वेकडून १३३८ बेवारस मुलांची सुटका

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

मुंबईच्या आकर्षणापोटी अनेक मुलं आपलं घर सोडून पळून मुंबईत येतात. घरात होणारी भांडणे, सिनेसृष्टीचं आर्कषण अशी अनेक कारणं यामागे असतात. अशा मुलांना वेळीच त्यांच्या पालकांकडं पाठवणं आवश्यक असतं. योग्य आणि सुरक्षित निवारा न मिळाल्यास ही मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम आखून अशा १००८ बेवारस मुलांची २०१७ मध्ये सुटका केली आहे. यामध्ये ६७३ मुलांचा आणि ३३५ मुलींचा समावेश होता.

पश्चिम रेल्वेची विशेष मोहीम

पश्चिम रेल्वेकडून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी २०१८-१९  हे वर्ष महिला व बाल सुरक्षा वर्ष म्हणून घोषित केले आहे. या अंतर्गत पश्चिम रेल्वेने विविध उपक्रम राबवून मे महिन्यांपर्यंत ३३० बेवारस मुला-मुलींची सुटका केली. त्यात २२० मुले आणि ११० मुलींचा समावेश आहे. देशाच्या विविध भागातून पळून आलेल्या या मुलांवर विशेष लक्ष पुरवण्याची सूचना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी केली आहे.

८८ स्थानकांवर मोहीम

आतापर्यंत पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, रतलाम आदी स्थानकांवर सापडलेल्या बेवारस मुलांना कुटुंबीयांशी पुनर्भेट करून दिली आहे. मुलांना स्थानिक पोलिसांच्या हाती सोपवण्यात येत आहे. यासाठी भारतीय रेल्वेद्वारा महिला व बालविकास मंत्रालयाच्या साहाय्याने मार्च २०१५ साली रेल्वेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची सुरुवात करण्यात आली. संपर्कात आलेल्या अशा सर्व मुलांची मदत करणं हाच उद्देश यामागे अाहे. पश्चिम रेल्वेच्या ७ स्थानकासह भारतात ८८ रेल्वे स्थानकात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या नंबरवर करा संपर्क

रेल्वे परिसरात कुठंही जर अशी बेवारस मुले फिरताना आढळली तर १०९८ या नंबरवर संपर्क करा,  असं अावाहन रेल्वे बोर्डाने केलं अाहे.  या मुलांच्या मदतीसाठी २४ तास ही सेवा सुरु राहणार आहे.


हेही वाचा - 

खूशखबर... मेट्रो २ ब सह ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात

सीएसटीएमवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट


पुढील बातमी
इतर बातम्या