IRCTC उन्हाळ्यात पुरवते दररोज दीड लाख पाण्याच्या बाटल्या

उन्हाळ्यात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असतात. अशावेळी पाण्याचा सहारा घेणाऱ्या प्रवाशांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी, रेल्वे प्रशासनाकडून जादा पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी जादा पाण्याच्या बाटल्या पुरविल्या जात असून, दररोज दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा रेल्वे प्रवासी आणि लांब पल्ल्यांच्या मेल, एक्स्प्रेसच्या प्रवाशांना करण्यात येत आहे.

माफक दरात थंडगार पाणी 

रेल्वे प्रवाशांसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) जास्त पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येत आहेत. प्रत्येक स्थानकावर थंडगार पाणी योग्य त्या दरात प्रवाशांना देण्यात येत आहे. अंबरनाथ इथं पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जात असून, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना अंबरनाथ येथून पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार दरदिवसाला दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा केला जात असल्याचं समजतं आहे.

जादा पाण्याचा पुरवठा

प्रवाशांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. तसंच, प्रवासी उन्हाळ्यात या मशीनचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतू, काही स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बंद अवस्थेत असल्यामुळं प्रवाशांची गैर सोय होते. त्यामुळं उन्हाळ्यात प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी जादा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो आहे.


हेही वाचा -

इंडिगो एअरलाइन्सन मुंबईतून सुरू करणार आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय विमान सेवा

मोबाईल तिकीटवर प्रवाशांना मिळणार ५ टक्के सूट


पुढील बातमी
इतर बातम्या