मध्य रेल्वेचे लोको पायलट उपोषणावर

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

मुसळधार पावसाने आधीच मध्य रेल्वेला तडाखा दिलेला असताना मंगळवारपासून मध्य रेल्वेच्या लोको पायलट्सनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या सेवेवर काहीही परिणाम होणार नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं, तरी प्रवासी मात्र धास्तावले आहेत.

आंदोलनाला कधीपासून सुरूवात?

मंगळवार १७ जुलै सकाळी ९ वाजेपासून सुरू करण्यात आलेलं हे उपोषण आंदोलन १९ जुलै गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत म्हणजे ४८ तास सुरू राहणार आहे. कामावर हजर असलेले कर्मचारी काहीही न खाता आपली सेवा देणार आहेत. तसंच सर्व लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं होणाऱ्या उपोषणात आळीपाळीने सहभागी होतील.

उपोषणाचं कारण काय?

रेल्वेचे विविध विभाग असले, तरी त्याचे केवळ दोनच भाग केले जातात. एक रनिंग स्टाफ आणि दुसरा नॉन रनिंग स्टाफ. यापैकी रनिंग स्टाफ म्हणजे रेल्वे चालवण्याशी संबधित कर्मचारी आणि नाॅन रनिंग स्टाफ म्हणजे कार्यालयीन कर्मचारी. दोन्ही कर्मचारी सारखीच मेहनत घेत असले, तरी रनिंग स्टाफला मिळणारा प्रवासभत्ता (मायलेज) नॉन रनिंग स्टाफपेक्षा खूपच कमी मिळतो. हा भत्ता १९८० मध्ये बनवण्यात आलेल्या नियमानुसार दिला जातो.

भत्ता वाढवून हवा

उदाहरण द्यायचं झाल्यास नॉन रनिंग स्टाफला भत्त्यापोटी जिथं ८०० रुपये देण्यात येतात, तिथंच रनिंग स्टाफला केवळ २५२ रुपये देण्यात येतात. त्यामुळे ही तफावत दूर करून रनिंग स्टाफलाही ८०० रुपये भत्ता देण्यात यावा, अशी मागणी ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनने केली आहे.

गेल्या वर्षभरापासून असोसिएशनकडून ही मागणी करण्यात येत आहे. मात्र रेल्वे बोर्ड यावर काहीही प्रतिक्रीया देण्यास तयार नाही. आमच्या मागणीचं पत्र आम्ही रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्री तसंच पंतप्रधान कार्यालयाला देखील पाठवलं. तरीही आमची दखल घेण्यात आलेली नाही. आताही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही उपोषण तीव्र करू.

- डी.एस कोपरकर, झोनल सचिव, (ए.आय.एल.आर.एस.ए)


हेही वाचा-

एल्फिन्स्टन स्थानक बनलं प्रभादेवी

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव


पुढील बातमी
इतर बातम्या