Advertisement

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव

राज्याची राजधानी आणि राज्याची उपराजधानी अशा मुंबई-नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव
SHARES

मुंबई-नागपूर हे ७०० किमीचं अंतर पार करण्यासाठी सध्या ट्रेनने १२ ते १५ तास खर्च करावे लागतात. रस्ते प्रवासासाठी याहूनही अधिक वेळ जातो. त्यामुळं राज्याची राजधानी आणि राज्याची उपराजधानी अशा मुंबई-नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली. या हायस्पीड ट्रेनमुळं ७०० किमीचं अंतर केवळ ६ तासांत पूर्ण करता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


समृद्धीचं कामही जोरात

मुंबई-नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्य सरकारनं हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळं मुंबई-नागपूर हे अंतर ८ ते ९ तासांत पार करता येणार असून हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाही सरकारकडून हा प्रकल्प रेटला जात असून सध्या जमीन संपादनाची प्रक्रिया वेगात सुरू आहे.


लवकरच अंतिम निर्णय

असं असताना याच समृद्धी महामार्गाला रेल्वेशी जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं पुढाकार घेतला आहे. त्यातूनच मुंबई-नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून तयार करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी नागपुरात दिली. या प्रस्तावाला राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्याबरोबर यासंबंधीचा अंतिम निर्णय घेऊ असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

बुलेट ट्रेनच्या मार्गात अाणखी एक विघ्न! गोदरेज समूहाची न्यायालयात धाव



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा