सर्वांसाठी लोकल सुरू होण्याबाबत राज्य सरकारची बुधवारी बैठक

महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास मंगळवारी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता सर्वांसाठी पुन्हा लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीत रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, व्यापारी, खासगी कार्यालये आणि मॉल्स यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुंबईतल्या लोकल सेवा सुरू करण्याबाबत पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. तसंच खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करत सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केलेली असतानाच राज्य सरकारने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली आहे. 

नवरात्रीनिमित्ताने सर्वच महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहिले होते. मात्र, रेल्वेकडून त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे पुन्हा रेल्वे मंडळाला पत्र लिहिले होते. नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सामान्य महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे परिपत्रक जारी केले होते. मात्र रेल्वेने यासंदर्भातली संमती नाकारली होती. त्यामुळे महिलांचा लोकल प्रवास लांबला होता.

आता महिलांना राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे. आता सगळ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याबाबत बुधवारच्या बैठकीत चाचपणी घेण्यात येणार आहे.


हेही वाचा-  

Good News: सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, तर पुरूषांना…

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य


पुढील बातमी
इतर बातम्या