Advertisement

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रवाशांनी अद्याप या एसी लोकलकडं पाठ फिरवली आहे.

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य
SHARES

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू केल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनानं एसी लोकलही मागील काही दिवसांपूर्वी सुरू केली. मात्र, या एसी लोकलला प्रवासी कमी प्रतिसाद देत असल्याचं निदर्शनास आलं आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुरू होताच पहिल्या ३ दिवसांत अवघी ११ तिकीट व २९ पासची विक्री झाली आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रवाशांनी अद्याप या एसी लोकलकडं पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरू नये यासाठी सरकारी, खासगी कार्यालयांबरोबरच खासगी वाहनांमधील एसी यंत्रणा बंद ठेवा किंवा त्याच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या. लॉकडाऊन होताच मार्चपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील एसी लोकलची सेवाही बंदच ठेवण्यात आली. मागील ६ महिन्यांपासून बंद असलेली एसी लोकल सेवा अखेर १५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर सुरू झाली.

ही सेवा सुरू होताच पहिल्या दिवशी ८ तिकीट आणि एका महिन्याचे ६ पास प्रवाशांनी काढले, तर १६ ऑक्टोबरला एक तिकीट आणि १२ पासांची विक्री झाली. १७ ऑक्टोबरलाही अल्प प्रतिसादच मिळाला. २ तिकीट आणि ११ पास विक्रीला गेल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. अशा रीतीने एकूण ११ तिकीट आणि २९ पासची विक्री झाल्याने अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले.

१५ ऑक्टोबरला ३०० हून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यात पासाचे गणित रेल्वेकडून वेगळ्या पद्धतीने मांडले जाते. एक पासधारक एका महिन्यात अप-डाऊन मिळून ५० वेळा प्रवास करणार. त्याप्रमाणे ५० प्रवासी असे गणित आहे. १५ ऑक्टोबरला ६ पास काढले असतील तर तेव्हापासून एका महिन्यात दररोज एकूण ३०० प्रवाशांचा प्रवास होणार हे गणित त्यामागे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय