बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती

राज्यासह देशामध्ये बेरोजगाराची प्रश्न आव आणून उभा आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन गेल्या चार वर्षांत हवेतच विरलं असून यामुळे बेरोजगार तरूणांमध्ये मोठी नाराजी आहे. असं असलं तरी आता मात्र केंद्र सरकारनं-पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नोकरभरतीचा सपाटा सुरू केला आहे. राज्यात सरकारनं ७२ हजार पदांची मेगाभरती जाहीर करत बेरोजगारांना दिलासा दिल्यानंतर आता बेरोजगारांच्या मदतीसाठी रेल्वेही धावून आली आहे. रेेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी येत्या दोन वर्षांत रेल्वेतील जवळपास ४ लाख जागा भरल्या जाणार असल्याची घोषणा करत बरोजगारांना मोठी खुशखबर दिली आहे. 

फेब्रुवारीपासून भरतीला सुरूवात

रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, दोन वर्षात रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती केली जाणार आहे. त्यानुसार दोन टप्प्यांमध्ये ही भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यातील जागा फेब्रवारीपासून भरल्या जाणार आहेत. फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या टप्प्यात १ लाख ३१ हजार जागा भरल्या जाणार आहेत. येत्या वर्षात रेल्वेतील १ लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत, तर त्याचवेळी सध्या १ लाख ३२ हजार पद रिक्त आहेत. त्यामुळे ही सर्व पद भरण्यासाठी रेल्वेकडून ४ लाख नोकऱ्यांची मेगाभरती जाहीर करण्यात आल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट  केलं आहे. 

मेगाभरतीत दुर्बल घटकांसाठी आरक्षण

रेल्वेच्या या मेगाभरतीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीसाठीही नियमानुसार जागा असणार असल्याचंही पियुष गोयल यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा -

१९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून धावणार 'राजधानी एक्सप्रेस'

एसटीच्या ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध


पुढील बातमी
इतर बातम्या