एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही मिळणार 'प्रमोशन'

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना महामंडळानं मोठी खूशखबर दिली आहे. एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदासह तृतीय श्रेणीतील बढतीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली. एसटी महामंडळातील ६० ते ७० हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयाचं एसटी कर्मचारी आणि एसटी संघटनांकडून जोरदार स्वागत होत आहे.

किती कर्मचाऱ्यांना फायदा?

एसटी महामंडळात चतुर्थ श्रेणी पदावर ६० ते ७० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात ड्रायव्हर, कंडक्टर, शिपाई, सहाय्यक अशा विविध पदावर हे कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये म्हणावं तसं कोणतंही स्थान नव्हतं. तृतीय श्रेणीसाठी ज्या काही परीक्षा व्हायच्या त्यात परीक्षेला बसून मेरिटमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यालाच तृतीय श्रेणीत बढती मिळायची. त्यामुळे ३० ते ३५ वर्षे सेवा दिल्यानंतरही जादा वेतनवाढ न मिळतानाच हे कर्मचारी निवृत्त होतात.

अनेक वर्षांची मागणी मान्य

या पार्श्वभूमीवर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही बढतीत प्राधान्य मिळावं, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून कर्मचाऱ्यांसह कर्मचारी संघटनांकडून होत होती. अखेर ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार बढती देताना वा नव्या तृतीय श्रेणीच्या जागा भरताना २५ टक्के भरती चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांची असेल, असं रावते यांनी स्पष्ट केलं आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर ही खूशखबर मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आणि संघटनांमध्ये उत्साहाचं वातारवण असल्याची माहिती श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. तर रावते, एसटी महामंडळ आणि राज्य सरकारचं आभारही त्यांनी मानले आहेत.


हेही वाचा-

एसटीच्या ताफ्यात लवकरच 700 नव्या गाड्या

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ४ दिवस टोलमाफी


पुढील बातमी
इतर बातम्या