संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होणारच!

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

वेतनवाढीच्या मुद्द्यावरून संपात सहभागी होत एसटी महामंडळाच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मुंबईसहित १०१० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय महामंडळाने घेतला होता. हा निर्णय महामंडळाने मागे घेतला असला, तरी संपात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीवर मात्र महामंडळ ठाम आहे. यामुळे संपादरम्यान जितके दिवस कर्मचारी गैरहजर होते तितक्या दिवसांची शिक्षा म्हणून त्यांची वेतनकपात होणार आहे.

किती होईल वेतनकपात?

नवीन कर्मचारी भरतीतील जे कर्मचारी या संपात सहभागी झाले होते, त्या सर्वांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र शिक्षा म्हणून 'ना काम, ना दाम' या तत्वानुसार त्यांचं एका दिवसाचं वेतन कापण्यात येणार आहे. सोबतच इतर कर्मचाऱ्यांसुद्धा ८ दिवसाचं वेतन कापण्यात येणार आहे. कर्मचारी १ दिवस गैरहजर असेल, तर त्याचं ९ दिवसांचं वेतन आणि २ दिवस गैरहजर असेल, तर १० दिवसांचं वेतन कापण्यात येईल.

कधी होणार वेतनकपात?

संपादरम्यान १ किंवा २ दिवस गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन जुलै महिन्याच्या पगारामधून कापलं जाईल. तर उर्वरीत ८ दिवसांच्या पगाराची रक्कम ऑगस्ट महिन्यापासून दर महिन्याला एका दिवसाच्या गैरहजेरीनुसार कापण्यात येईल.

३३ कोटींचं नुकसान

संपादरम्यान शिवशाहीच्या १९ बसगाड्यांसह ९३ बसगाड्यांचं संपकऱ्यांनी अडवून फोडल्या. संपामुळं आधीच तोट्यात असलेल्या एसटीला ३३ कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.


हेही वाचा-

आषाढी एकादशीनिमित्त ३७८१ जादा एसी बस

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना एसटी देणार संधी


पुढील बातमी
इतर बातम्या