मुंबईत काली-पीली, ओला-उबरला टक्कर देणार 'एस-३'!

गर्दीच्या वेळी अवाच्या सव्वा आकारले जाणारे भाडे, मनमानी कारभार आणि अरेरावीपणाला कंटाळून मुंबईकरांनी ओला, उबर या कॅब सेवांकडे पाठ फिरवली. पण आता मुंबईकरांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मराठी चालकांनी एकत्र येऊन 'एस ३' म्हणजेच 'सह्याद्री स्मार्ट सेफ प्रायव्हेट लिमिटेड' ही नवी खासगी टॅक्सी सेवा प्रवाशांच्या सेवेत आणली आहे. या सेवेचं उद्घाटन १२ मे रोजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं.

मराठी तरूणांची संकल्पना

'एस ३' कॅब सेवेच्या संकल्पनेमागे प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते या मराठी तरूणांचा हात आहे. गेल्या एक वर्षापासून प्रफुल्ल आणि राजेश कॅब सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्यांच्या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी 'भारत फ्रेट' या कंपनीनं पुढाकार घेतला.

सध्या तरी मुंबईतच ही सेवा सुरू असून लवकरच आम्ही इतर शहरांतही विस्तार करणार आहोत. सध्या ४००० चालकांनी कंपनीत नोंदणी केली असून त्यापैकी ८०० हून अधिक चालक सेवेत उतरवले आहेत. याशिवाय जवळपास ३५० महिला चालकांचाही समावेश आहे. लवकरच या महिला चालकांनाही आम्ही सेवेत उतरवणार आहोत. १० टॅक्सी युनियन्सने आम्हाला पाठिंबा दर्शवत चालक देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

प्रफुल्ल शिंदे, संस्थापक सदस्य, एस ३

कशी आहे एस ३ सेवा?

गेल्या वर्षीपासून या एस ३ कॅबच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओला आणि उबर यांच्या सेवांमध्ये जे अडथळे आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न एस ३ कॅब सेवेत करण्यात आला आहे. ओला आणि उबेरमध्ये तुम्हाला मोबाईल अॅप द्वारे बुकिंग करावी लागत होती. पण एस ३ कॅब या सेवेत तुम्हाला कॉलचा देखील पर्याय दिला आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही मोबाईलनं बुकिंग करू शकता किंवा कॉल करून कॅब बोलावू शकता. त्यामुळे जे स्मार्टफोन फ्रेंडली नाहीत, त्यांच्यासाठी देखील ही सेवा लाभदायी आहे. याशिवाय ओला-उबेरपेक्षा कमी भाडं यामध्ये आकारलं जाईल, असा दावा प्रफुल्ल शिंदे यांनी केला आहे.

प्रवाशांच्या सोयीनुसार चालक उपलब्ध असतील. जर कुणाला मराठी चालक हवा असेल किंवा इतर कुठल्या भाषेचा चालक हवा असेल, तर ती देखील सोय एस ३ कॅब सेवेत केली आहे. जर महिलांना महिला चालकच हवी असेल, तर त्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी विशेष सुविधा

प्रवाशांसोबतच चालकाची सुरक्षा देखील महत्त्वाची असते. एस ३ मध्ये देखील प्रवासी आणि चालक दोघांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्यात आले आहेत. कारच्या पुढे आणि मागे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. पुढचा कॅमेरा कारच्या बाहेरचं दृश्य रेकॉर्ड करेल. तर मागचा कॅमेरा हा प्रवाशांच्या सोयीनुसार ठेवण्यात आला आहे. जर प्रवासी कुठल्या संकटात असेल, तर तो एस ३ अॅपच्या मदतीनं एसओएस बटण दाबून मदत मागू शकतो. मदत मागताच मागचा कॅमेरा ऑन होणार आणि त्यावेळी घडलेलं जे काही असेल ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार.

याशिवाय सेक्युरिटी सर्च पॅनल देखील बनवण्यात आलं आहे. यामध्ये एसओएस बटण दाबताच एस ३ची टीम तुमच्या मदतीला धावून येणार आहे. यासाठी १५० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. जीपीएस आणि एसओएसच्या मदतीनं ही टीम संकटकाळी तुम्हाला मदत करेल. चालकावर देखील कॅमेऱ्याचे लक्ष्य असणार आहे.

किती भाडं आकारणार?

प्रवाशांकडून एका किलोमीटरमागे मिनीसाठी १६, सदानसाठी १८ आणि एसयुव्हीसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत. तर चालकाला  मिनीसाठी १०, सदानसाठी १२ आणि एसयुव्हीसाठी १४ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे प्रवासी आणि चालक अशा दोघांना याचा फायदाच आहे. याशिवाय इतर कॅबनुसार नाईट चार्ज देखील लावला जाणार नाही.

प्रफुल्ल शिंदे हे स्वत: उबरमध्ये चालक होते. सुरुवातीला उबर आणि ओला या कंपन्यांनी प्रवासी आणि चालक या दोघांना प्रचंड आश्वासनं दिली होती. महिन्याला १ लाखाहून अधिक रुपयांचा फायदा होईल असं आश्वासन दिलं गेलं. त्यामुळे चालकांनी दागिने गहाण ठेवून किंवा इतर काही मार्गानं पैसे उभे केले. पण प्रत्यक्षात तेवढे पैसे चालकांना मिळालेच नाहीत. त्यामुळे चालकांचं नुकसान झालं. प्रवाशांकडून तरी अवाच्या सव्वा पैसे आकारले जातात? पण याचा फायदा चालकांना कधीच झाला नाही. यामुळे प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते यांनी एस ३ कॅब सेवा सुरु केली.


हेही वाचा

ओला-उबरचा मनमानी कारभार थांबणार, भाडेवसुलीवर आता सरकारचे नियंत्रण

पुढील बातमी
इतर बातम्या