ओला-उबेर खरंच सुरक्षित आहेत का?

मात्र, गेल्या काही दिवसांमधल्या घटना बघितल्या, तर या खाजगी टॅक्सी सेवेच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. कधी ओला उबेरच्या गाड्या अपघातग्रस्त होताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्या चालकांवर प्रवासी महिलांचा विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल होत आहेत.

ओला-उबेर खरंच सुरक्षित आहेत का?
SHARES

ओला आणि उबेरसारख्या खाजगी टॅक्सी सेवा या आपल्या पारंपारिक काळ्या पिवळ्या टॅक्सींना पुरून उरताना दिसतायेत. आलिशान गाडी, त्यात सगळ्या सोयी-सुविधा असून देखील, स्वस्त असल्याने नागरीक देखील ओला उबेरला आपली पसंती देताना दिसून येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमधल्या घटना बघितल्या, तर या खाजगी टॅक्सी सेवेच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. कधी ओला उबेरच्या गाड्या अपघातग्रस्त होताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्या चालकांवर प्रवासी महिलांचा विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यात यावर्षीचा आकडा तर खूपच मोठा आहे.


उबेर चालक बसला थेट महिलेच्या शेजारी

२७ सप्टेंबरला एका उबेर चालकाने ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. महिला अंधेरीवरून कंबाला हिल येथे जात होती. सुरवातीला चालकाने महिलेशी संवाद सुरु केला आणि तिला वैयक्तिक प्रश्न विचारू लागला. त्यानंतर वांद्रे वरली सी लिंक पार केल्यानंतर चालकाने अचानक गाडी थांबवली आणि महिलेच्या शेजारी येऊन बसला, चालकाने मागे येताच मोबाईलमधील व्हीडिओ दाखवत महिलेचा हात पकडला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर महिलेने गाडीतून उतरून पळ काढला. या प्रकरणी चालकाविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


अपघाताची तक्रार मागे घेण्यासाठी उबेर चालकाची धमकी

एप्रिल महिन्यात नताशा अगरवाल नावाची महिला उबेरने जात असताना गाडीला अपघात झाला. विमानतळावरून गाडी महालक्ष्मीच्या दिशेने येत असताना वरळीजवळ गाडी डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता, की त्यात नताशाचा हात आणि पायाला मल्टीपल फ्रॅक्चर झाले, तिचे दात पडले, त्याचबरोबर जबड्याला देखील गंभीर जखम झाली. अजूनही नताशा पूर्ण बरी झालेली नाही. विशेष म्हणजे घटनेच्या पाच महिन्यांनंतर केस मागे घेण्यासाठी चालक सोमनाथ सावंतने नताशाच्या वडिलांना धमकीवजा इशाराही दिला होता.


इटालियन महिलेचा उबेर चालकाने केला विनयभंग

१७ ऑगस्टला एका इटालियन महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला. वर्सोवावरून पाली हिलला जाण्यासाठी या महिलेने उबेर बुक केली. मात्र, चालक शेहबाज अब्दुल सत्तार शेखानी(३६)च्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सरळ पाली हिलच्या दिशेने जायचं सोडून त्याने गाडी गल्ली-बोळातून काढली आणि एका सुनसान गल्लीत गाडी थांबवली. पाठच्या काचेतून नीट दिसत नसल्याचा बहाणा करून तो पाठी आला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडा ओरड केल्यानंतर चालक पुन्हा आपल्या सीटवर जाऊन बसला आणि गाडी सुसाट पळवू लागला. थोड्या वेळात चालकाचं डोकं पुन्हा फिरलं आणि गजधरबांधला येताच तो पुन्हा एकदा मागच्या सीटवर आला. यावेळी महिलेने आरडा ओरडा करताच आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने महिलेला गाडीतून बाहेर फेकले आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी चालक शेहबाझला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली होती.


तरुणीसमोर ओला चालकाने केले अश्लील चाळे

८ ऑगस्टला मूळची गाझियाबादची असलेल्या तरुणीसोबत देखील असाच प्रकार घडला. मुलाखती( interview )साठी मरोळ वरून लोअर परेलला जायचं असल्याने तिने शेअर ओला बुक केली. त्यात आधीच तिघे प्रवासी असल्याने महिलेला पुढे बसावे लागले. दादरला इतर तिघे उतरल्यानंतर ओला प्रभादेवीला पोचते न पोचते, तोच चालक अरुण कुमार तिवारीने(३८) महिलेसमोर अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. या प्रकरणी मुलाखतीनंतर महिलेने तक्रार केली होती. याप्रकरणी चालक अरुण कुमार तिवारीला ३५४(अ) कलमांतर्गत अटक करण्यात आली होती.


चालकाची महिलेशी हुज्जत, ओलाने झटकले हात

१६ ऑक्टोबरला नवी मुंबईत राहाणाऱ्या महिलेला मेडिकल चाचणीसाठी दक्षिण मुंबईत यायचे होते. तिने सकाळी ओला कॅब बुक केली. मात्र त्यानंतर उशीरा येऊन देखील चालकाच्या अरेरावीला महिलेला सामोरे जावे लागले. महिलेने घाई झाल्याचं सांगताच चालकाने महिलेला गाडीतून उतरण्यास सांगितले. त्यानंतर देखील त्याने महिलेशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे याची महिलेने ओलाकडे तक्रार केली असता, त्यांनी चालकावर कारवाई करण्याऐवजी महिलेचच अकाउंट ब्लॉक केलं. यावेळी चालकावर हात उचलणं हे कंपनी पॉलिसीविरोधात असल्याचं कारण देण्यात आलं.


चालकाला लागली झोप, ओला थेट समुद्रात

सप्टेंबर महिन्यात ओला चालकाचा झोपेत गाडी वेगाने चालवण्याचा भुर्दंड प्रवाशांना भोगावा लागला. मुंबई दर्शनसाठी नायगावला राहाणाऱ्या तरुणाने ओला बुक केली होती. त्यानंतर माहिमला जात असताना हाजी अली समोर चालक अब्दुल रशीद शेख (३५)चा डोळा लागला आणि गाडी थेट समुद्रात जाऊन पडली. या दुर्घटनेत गाडीचं मोठं नुकसान झालं. मात्र सुदैवाने कोणाला गंभीर जखमा झाल्या नाहीत. या प्रकरणात चालकाविरुद्ध ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


अभिनेत्रीचा उबेरचा वाईट अनुभव

अभिनेत्री मल्लिका दुआचा देखील उबेर कॅबचा अनुभव तितकासा चांगला नाही. मल्लिकाने उबेर चालकाला एसी वाढवण्यास सांगितल्यानंतर चालकाने चक्क मल्लिकाला गाडीतून उतरण्यास सांगितले. 'मी पूर्ण पैसे दिले आहेत, मी का उतरू?' असं माल्लिकाने म्हटल्यावर चालकाने मल्लिकाला शिवीगाळ केल्याचं मल्लिकाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.



हेही वाचा 

ओला चालकाची पुन्हा मनमानी, तक्रार करून देखील ओलाने मात्र चालकाला घातलं पाठीशी

चालकाला झोप लागल्याने ओला थेट समुद्रात


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा