२४ डब्यांची एक्स्प्रेस लवकरच सीएसएमटी स्थानकावर थांबणार

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्लॅटफॉर्म क्र. 10 ते 14 पर्यंत विस्तार सुरू आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर १२ ते १८ डब्यांच्या एक्स्प्रेस उभ्या राहू शकतात. मात्र, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर २४ डबे असलेल्या एक्स्प्रेसला थांबता येणार आहे. 

सीएसएमटी येथून दररोज ९० लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ते 14 ची लांबी कमी असल्याने येथे 24 डब्यांची गाडी उभी राहू शकत नाही. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवता आलेली नाही.

डब्यांची संख्या वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी एकूण 62.12 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पाचही प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी-दादर विभागातील गाड्यांचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 ची सध्याची लांबी 298 मीटर आहे आणि विस्तारानंतर ती 680 मीटर होईल. प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13, 14 ची सध्याची लांबी 385 मीटर असून विस्तारानंतर ती 690 मीटर होईल.

सध्या फलाट क्रमांक 10 ते 14 पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग सिस्टीम, रेल्वे कनेक्शन आदींची कामे करण्यात येत आहेत.


हेही वाचा

मुंबईच्या वेशीवरील ५ नाक्यावरचा टोल वाढला

मुंबईजवळ तयार होतोय नवा रेल्वेमार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या