मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर २९ नव्या ड्रेनेज लाईन्स

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. २९ सप्टेंबरला झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तत्काळ बैठक घेत प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचं सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आतापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक रेल्वे स्टेशनचं ऑडिट करण्यात आलं आहे.

ऑडिट दरम्यान आढळणाऱ्या त्रुटींवर चर्चा करण्यासाठी सोमवारी वांद्र्याच्या चेतना कॉलेजमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या बैठकीत मुंबई उपनगरातील मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकासंबंधीत मल्टी डिसेप्लेशनरी टीमने सुचवलेल्या त्रुटींसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यात मध्य रेल्वेवरील स्टेशनच्या ट्रॅकवर पाणी साचू नये म्हणून २९ नव्या ड्रेनेज लाईन्स बसवण्यात येतील. या प्रस्तावाला रेल्वे आणि महापालिकेने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १५ 'कल्व्हर्ट्स' बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी ८ 'कल्व्हर्ट्स'ला मंजुरी मिळाली आहे.

निविदा मागवल्यानंतर आम्ही पुढील काही दिवसांत नवीन कल्व्हर्ट तयार करण्यावर काम सुरू करू. कल्व्हर्ट तयार करण्यासाठी जमिनीच्या आत ३ मीटर खाेदकाम करण्यात येईल. नवीन गटार बनवण्यापेक्षा सध्याच्या कल्व्हर्ट्सची सफाई केली जाईल.

- एस. के. जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

२९ ऑगस्टला रेल्वेच्या ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत घरी जावं लागलं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही एस. के. जैन यांनी स्पष्ट केलं.

'या' स्टेशनवर कल्व्हर्ट्स

कुर्ला, मस्जिद, सायन, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंड या स्टेशनवर कल्व्हर्ट बांधण्यात येणार आहेत. शिवाय, अतिरिक्त कल्व्हर्ट तयार करण्यासाठी मध्य रेल्वेचे काही अधिकारी ठाणे आणि नवी मुंबईच्या स्थानिक प्रशासनाशीही जोडले गेले आहेत.

शिवाय, रेल्वे ट्रॅकवर साचणाऱ्या नाल्याच्या पाण्यासाठी मुंबई महापालिकेला विनंती करण्यात आली आहे की, रेल्वेे मार्गावर येणाऱ्या सर्व नाल्यांचं दूषित पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. रेल्वेेच्या परिसरात जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचंही यावेळी रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. रेल्वे मार्गाच्या जवळ राहणाऱ्या स्थानिकांकडून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

पश्चिम रेल्वे अत्याधुनिक सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

अखेर अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त!


पुढील बातमी
इतर बातम्या