NMMT ताफ्यात 150 नव्या CNG बस

नवी मुंबई महापालिका परिवहन (NMMT) सेवेला बळकटी देण्यासाठी 150 नव्या CNG बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या बसेसचे लोकार्पण महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते घणसोली आगारात झाले. यावेळी महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत उपस्थित होते.

सध्या NMMT च्या ताफ्यात 416 बस कार्यरत आहेत. नव्याने समाविष्ट होणाऱ्या 150 CNG बसांपैकी 65 बस प्राप्त झाल्या असून उर्वरित 85 बस पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणार आहेत. यापैकी 51 नव्या बसांना हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल करण्यात आले.

नव्या CNG बसेसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे. तसेच इंधन खर्चात बचत होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की, नवी मुंबई महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत 400 महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात या महिला NMMT च्या बस चालवतील. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच सार्वजनिक वाहतुकीत त्यांचा सहभाग वाढवण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, परिवहन समितीचे अध्यक्ष विकास झंजाड यांनी NMMT आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले. तसेच चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णयही घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्य मुद्दे:

  • NMMT ताफ्यात 150 नव्या CNG बसांचा समावेश

  • 65 बस प्राप्त; 85 बस लवकरच दाखल होणार

  • 51 बसांचे लोकार्पण करून सेवेत दाखल

  • सध्या NMMT कडे 416 बसांचा ताफा

  • 400 महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण

  • पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासावर भर


हेही वाचा

मुंबई मेट्रो मार्ग 2ए, 7, 9 आणि 2बी वर सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्येची नोंद

पुढील बातमी
इतर बातम्या