नेरुळ - भाऊचा धक्का जलवाहतूक लवकरच सुरू

नेरुळ ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक अवघ्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपर्यंत नेरुळ जेट्टीचे काम पूर्ण होईल, असं सि़डकोने सांगितलं आहे. त्यानंतर नवी मुंबईतून ही जलवाहतूक सुरू होईल.

कोरोनामुळे नेरुळ ते भाऊचा धक्का हा जलवाहतूक प्रकल्प रखडला होता. आता या प्रकल्पाने गती घेतली आहे. नेरुळ जेट्टीचे काम पुन्हा सुरू झालं आहे. या जेट्टीच्या कामाची पाहणी नुकतीच खासदार राजन विचारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी केली. त्यावेळी जेट्टीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता एम. के. गोडबोले यांनी दिली.

या जलवाहतुकीमुळे नवी मुंबईतील नागरिकांना कमी वेळात मुंबईत जाता येणार आहे. तसंच त्यांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल. मेरिटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याद्वारे नेरुळ ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.  या ठिकाणी जेट्टीबरोबरच १० बस व २० कार येथे उभी करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्थाही सिडकोकडून करण्यात येत आहे. येथे तिकिट आरक्षण सुविधाही असणार आहे. या सर्व कामांसाठी १११ कोटींचा खर्च येणार आहे. 

मांडवा येथील जेट्टीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीपर्यंत मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावरील ‘रो रो’ बोटसेवा सुरू होणार आहे. त्यानंतर नेरुळ ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक सुरू होईल. जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं


पुढील बातमी
इतर बातम्या