बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं

अधिकृत ओळखपत्रावरच प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु, अनेकांनी बनावट ओळखपत्र बनवून लोकलमध्ये घुसकोरी केल्याचं समजताच रेल्वे प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली.

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकल सेवा 'मिशन बिगिन अगेन'च्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आली. सुरुवातीला लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा होती. तसंच या प्रवासासाठी क्यूआर कोड ओळखपत्राची गरज होती. त्यानुसार अधिकृत ओळखपत्रावरच प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु, अनेकांनी बनावट ओळखपत्र बनवून लोकलमध्ये घुसकोरी केल्याचं समजताच रेल्वे प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकल प्रवासात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही धरपकड मध्य रेल्वेकडून केली जात आहे. आतापर्यंत १५० ओळखपत्र जप्त करण्यात आले असून, यामध्ये ८० टक्के  बनावट ओळखपत्र मुंबई महापालिकेच्या नावानं असल्याची माहिती समोर येत आहे.

१५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मध्य रेल्वेतून सध्या २ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. लोकल अद्याप सर्व प्रवाशांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा येथून प्रवास करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रस्ते प्रवास करताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने लोकल प्रवास केला जात आहे. यासाठी बनावट ओळखपत्राचा आधारही घेतला जात आहे. अशा प्रवाशांची रेल्वे तिकीट तपासनीस, रेल्वे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे.

रेल्वे स्थानकात प्रवेशाआधी तिकीट, ओळखपत्राची तपासणी करतानाच बनावट ओळखपत्र बाळगल्याचे दिसताच त्यांना हुसकावून लावले जाते आणि ओळखपत्र जप्त केले जात आहे. अशा तऱ्हेने १५० बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबई पालिकेच्या नावाची १०० पेक्षा जास्त बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. अन्य पालिका, विविध रुग्णालयांच्या नावाने ओळखपत्र आहेत. खासगी कार्यालयात काम करणाऱ्यांबरोबरच छोटा व्यवसाय करणारे, घरकाम करणाऱ्या महिलाही आहेत.

याप्रकरणी बनावट ओळखपत्र घेऊन लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशावर कारवाई करण्यात येत आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत वडाळा, दादर, ठाणे स्थानकात रेल्वे पोलिसांकडे एकूण ३ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा