इंधन दरवाढ कायम, मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ

पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. रविवारी सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. पेट्रोलचे दर २८ पैशांनी तर डिझेलचे भाव १८ पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल ८९.३० रुपयांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७८.२४ रुपये झाले आहेत. ही भाववाढ अशीच सुरू राहिल्यास, सोमवारी मुंबईत पेट्रोल नव्वदीपार जाईल, अशी शक्यता आहे.

मुंबईत पेट्रोल ३.२१ पैशांनी महाग

विरोधकांनी भारत बंदची हाक दिल्यानंतरही पेट्रोलचे भाव उतरले नाहीत. गेल्या १५ दिवसांत पेट्रोलच्या भाववाढीचा आलेख सतत उंचावत चालला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८६.०९ रुपयांना मिळत होतं. आता १५ दिवसांत ते ८९.३० रुपये इतकं झालं आहे. म्हणजेच गेल्या १५ दिवसांत पेट्रोलच्या भावात ३.२१ रुपयांची वाढ झाली आहे.

या शहरांमध्ये नव्वदी पार

मुंबईत अद्याप पेट्रोलने नव्वदी पार केली नसली तरी राज्यातील अनेक शहरांमध्ये कधीच पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. पुणे, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूर या शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. आता त्यात मुंबईचाही क्रमांक लागण्याची दाट शक्यता आहे.


हेही वाचा-

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!


पुढील बातमी
इतर बातम्या