Advertisement

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!

आधीच तोट्यात चालणाऱ्या मोनोमुळे दिवसाला लाखोंचा नुकसान सहन करणाऱ्या 'एमएमआरडीए'च्या नुकसानीत आता आणखी, मोठी वाढ होणार आहे. कारण याआधी जिथं 'एमएमआरडीए' स्कोमी आणि एल अॅण्ड टी कंपनीला प्रति ट्रिपसाठी ४६०० रुपये देत होते तिथं आता 'एमएमआरडीए'ला प्रति ट्रिप १०, ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!
SHARES

चेंबूर ते वडाळा मोनोरेल तब्बल ९ महिन्याच्या ब्रेकनंतर १ सप्टेंबरनंतर पुन्हा ट्रॅकवर येणार आहे. पण मोनोरेलला पुन्हा ट्रॅकवर आणणं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ला चांगलंच महागात पडलं आहे. आधीच तोट्यात चालणाऱ्या मोनोमुळे दिवसाला लाखोंचा नुकसान सहन करणाऱ्या 'एमएमआरडीए'च्या नुकसानीत आता आणखी, मोठी वाढ होणार आहे. कारण याआधी जिथं 'एमएमआरडीए' स्कोमी आणि एल अॅण्ड टी कंपनीला प्रति ट्रिपसाठी ४६०० रुपये देत होते तिथं आता 'एमएमआरडीए'ला प्रति ट्रिप १०, ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

'एमएमआरडीए'नं हे दर देण्याचा निर्णय घेतला असून या दरानुसारच यापुढं मोनो धावेल, अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे. कित्येक पटीनं हे दर वाढल्यानं आता 'एमएमआरडीए'साठी मोनोरेल पांढरा हत्ती ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.


चेंबूर ते वडाळा मार्ग फेल

चेंबूर ते वडाळा मोनोमार्ग गेल्या तीन-सव्वातीन वर्षांपासून कार्यरत आहे. पण या मार्गाला मुंबईकरांकडून प्रतिसादच न मिळाल्यानं हा मार्ग फेल ठरला आहे. मोनोमुळं एमएमआरडीएला दिवसाला ६ ते ७ लाखांचं नुकसान सहन करावं लागतं होतं. असं असतानाच ९ महिन्यांपूर्वी मोनोच्या डब्ब्याला आग लागली नि मोनो पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळं नुकसानीचा आकडा आणखी फुगला. त्यातच सुरक्षेवर आणि मोनो पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी 'एमएमआरडीए'ला आणखी भुर्दंड सहन करावा लागला.


दर वाढवून मागितले

असं असताना मोनोरलंच व्यवस्थापन आणि देखभाल करणाऱ्या कंत्राटदार कंपनीनं, स्कोमी आणि एल अॅण्ड टी इंजिनियरींग कंपनीनं मोनोच्या व्यवस्थापन-देखभालीसाठी दर वाढवून मागितले आहेत. ४६०० रु. प्रति ट्रिपएेवजी १८००० रुपये प्रति ट्रिप असे दर कंपनीनं मागितले होते.


पाचपट दरवाढ

अर्थात सध्याच्या दराच्या पाच पट हे दर होते. मुळात करारानुसार दर तीन वर्षांनी दरात वाढ करण्याची तरतूद आहे. पण मोनो तोट्यात चालल्यानं कंपनीनं दरवाढ मागितली नाही आणि 'एमएमआरडीए'नंही कधी दरवाढीचा विषय काढला नाही. आता मात्र कंत्राटदार कंपनीनं ठाम भूमिका घेत सध्याच्या दरात आपल्याला मोनोचं व्यवस्थापन-देखभाल शक्य नसल्याचं म्हणत पाचपट वाढ मागितली होती.


समितीची स्थापना

आधीच मोनोमुळं मोठा तोटा सहन करावा लागत असताना आता या दरवाढीचा भार पडणार असल्यानं 'एमएमआरडीए'च्या अडचणी वाढल्या होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्य वाहतूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. त्यानुसार अखेर १८००० प्रति ट्रिप दरांएेवजी १०, ६०० रुपये प्रति ट्रिप दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणं कंत्राटदार कंपनीची मनधरणी करत हे दर निश्चित करण्यात आले आहेत. सध्याच्या दराच्या तुलनेत हे दरही खूप वाढल्यानं आता त्याचा फटका नक्कीच 'एमएमआरडीए'ला बसणार आहे.


प्रवासी भाड्यावर परिणाम नाही

देखभाल-व्यवस्थापनाच्या दरात वाढ झाल्यानं साहजिकच मोनोच्या खर्चात, 'एमएमआरडीए'च्या खर्चात वाढ होणार आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम प्रवाशी भाड्यावर होणार नसल्याची माहिती कवठकर यांनी दिली आहे. हा बोजा प्रवाशांवर टाकणार नसल्याचं म्हणत 'एमएमआरडीए'नं प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.हेही वाचा-

गुड न्यूज! 1 सप्टेंबरपासून मोनो पुन्हा ट्रॅकवर

मोनोमागचं शुक्लकाष्ठ संपेना, कंत्राटदारांची पाचपट जादा दराची मागणीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा