Advertisement

Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला, मात्र कोंडी कायम

लोणावळा ते तळेगाव या पट्ट्यात वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत.

Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला, मात्र कोंडी कायम
SHARES

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेला अपघातग्रस्त टँकर अखेर 32 तासांनंतर बाजूला काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मात्र, या अपघाताचे परिणाम अजूनही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.

बोरघाट विभाग जरी मोकळा झाला असला, तरी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

विशेष म्हणजे, तासनतास कोंडीत अडकलेले अनेक वाहनचालक रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून झोपी गेल्याने आता नवीन पेच निर्माण झाला आहे.

चालक झोपल्याने कोंडीत भर

एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ट्रक आणि अवजड वाहनांचे चालक रात्रभर कोंडीत अडकल्याने थकले होते.

रस्ता मोकळा होण्याची वाट पाहता पाहता अनेक चालकांनी रस्त्याच्या मधोमधच स्टीयरिंगवर डोकं टेकवून झोप घेतली.

आता पोलीस आणि प्रशासन रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत असताना, हे चालक वेळेवर जागे होत नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडकला आहे. या विचित्र परिस्थितीमुळे वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत.

मावळ परिसरात परिस्थिती गंभीर

टँकर हटवल्यानंतरही या महामार्गावरील कोंडीचे परिणाम पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात प्रकर्षाने जाणवत आहेत.

लोणावळा ते तळेगाव या पट्ट्यात वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. एक्सप्रेस वेवरील कोंडी टाळण्यासाठी अनेक चालकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा आधार घेतला.

मात्र तिथेही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे.

32 तासांनंतरी प्रतीक्षा कायम

आडोशी बोगद्याजवळील तो अपघातग्रस्त टँकर हलवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.

क्रेनच्या सहाय्याने 32 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र, अद्यापही रस्ता पूर्णपणे सुरळीत झालेला नाही.

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी 2 ते 3 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा