चाकरमान्यांसाठी बेस्ट आली धावून, बेस्टने सोडल्या ११५ गाड्या

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

एरवी ओव्हरहेड वायर तुटणं, रेल्वे ट्रॅकला तडा जाणं किंवा पावसामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची सवय असणाऱ्या चाकरमानी मुंबईकरांना मंगळवारी सकाळी वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागलं. रेल्वे अॅप्रेंटिसच्या प्रशिक्षणार्थींनी माटुंगा ते दादर दरम्यान रेलरोको केल्याने तब्बल साडेचार तास रेल्वे सेवा ठप्प होती. परिणामी हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले. मात्र एक लाईफलाईन ठप्प असताना मुंबईकरांच्या मदतीला धाऊन आली दुसरी लाईफलाईन अर्थात बेस्ट. आंदोलनादरम्यान बेस्ट प्रशासनाने सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत माटुंगा, दादर सहित शहरातील १४ मार्गांवर विशेष बस सोडून चाकरमान्यांना दिलासा दिला.

नेमकं काय घडलं?

रेल्वे भरतीतील आरक्षण वाढवून मिळावं या मागणीसाठी धुळे, भुसावळ आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या रेल्वेतील अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी सकाळी ७ वाजता अचानक मध्य रेल्वेच्या मांटुगा स्थानकावर रेल्वे ट्रॅक रोखून धरला. त्यामुळे मांटुगा ते सीएसएमटी रेल्वे सेवा पूर्णत: ठप्प झाली. यामुळे सकाळी सकाळी आॅफिस आणि महाविद्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

ओला, उबेरच्या संपाची भर

माटुंगा-सीएसएमटी मार्ग बंद त्यात ओला-उबेरचा संप त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या. अशावेळेस मुंबईकर प्रवाशांच्या मदतीला धावून आली ती बेस्ट. रेलरोकोमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा बंद झाल्याचं समजताच बेस्टनं मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच विविध बस डेपोमधून अतिरिक्त बस गाड्या सोडण्यास सुरूवात केली.

किती बस सोडल्या?

सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान बेस्टनं विविध मार्गांवर तब्बल ११५ अतिरिक्त गाड्या सोडल्या. १४ मार्गांवरून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त गाड्यांमुळे चाकरमान्यांची सोय झाली आणि अनेकांना आपल्या निश्चित स्थळी पोहचणं सोपं झालं. दरम्यान दुपारी ११ वाजता अॅप्रेंटिसनी आंदोलन मागे घेतलं आणि त्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आणि प्रवाशांनी सुटकेची निश्वास सोडला.


हेही वाचा-

रेल्वे प्रशिक्षणार्थींना मनसेचा पूर्ण पाठिंबा- राज ठाकरे

म्हणून, प्रशिक्षणार्थींवर केला लाठीचार्ज- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या