Advertisement

रेल्वे प्रशिक्षणार्थींना मनसेची साथ, शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी प्रशिक्षणार्थींच्या सगळ्या मागण्या रास्त असून मनसेचा या विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांना पाठबळ दिलं.

रेल्वे प्रशिक्षणार्थींना मनसेची साथ, शिष्टमंडळ दिल्लीला जाणार
SHARES

रेल्वेतील अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थींना रेल्वे भरतीतील आरक्षण वाढवून मिळावं यासह इतर मागण्यांसाठी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी प्रशिक्षणार्थींच्या सगळ्या मागण्या रास्त असून मनसेचा या विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांना पाठबळ दिलं. सोबतच जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत लढत राहणार असंही स्पष्ट केलं.


शिष्टमंडळ दिल्लीत जाणार

त्यानुसार या भरतीप्रकरणी मनसेचं एक शिष्टमंडळ बुधवारी २१ मार्च रोजी दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. सोबतच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळही सोबत असणार आहे.


म्हणून, आंदोलन चिघळलं

प्रशिक्षणार्थींनी सकाळी ७ वाजता मध्य रेल्वेच्या माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनामुळे एकापाठोपाठ एक लोकलगाड्यांच्या रांंगा लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. परंतु आंदोलनाला २ तास उलटून गेले तरी एकही रेल्वे प्रशासनाचा अधिकारी वा सरकारी प्रतिनिधी प्रशिक्षणार्थींसोबत चर्चा करण्यास उपस्थित नव्हता. त्यातच लाठीचार्ज झाल्याने हे आंदोलन चिघळत चाललं होतं.

दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माटुंगा इथं धाव घेत प्रशिक्षणार्थींसोबत चर्चा सुरू केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रशिक्षणार्थींना लेखी आश्वासन देण्याचं मान्य केल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी तब्बल ४ तासानंतर रेल्वे ट्रॅक सोडला. त्यानंतर हळुहळू वाहतूक सुरू झाली.



मनसेचा पाठिंबा

त्यानंतर या प्रशिक्षणार्थींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढं आपलं म्हणणं मांडण्यासाठी भेट मागितली. त्यानुसार वांद्र्यातील एमआयजी क्लब इथं राज ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर प्रशिक्षणार्थींच्या मागण्या रास्त असून मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं.


काय आहेत मागण्या?

  • रेल्वेचा २० टक्के आरक्षणाचा कोटा कायमस्वरुपी रद्द करावा
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावं
  • रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेच्या सेवत सामावून घ्यावं तसंच भविष्यातही हा नियम लागू ठेवावा
  • यासंदर्भातील नियम महिन्याभरात व्हावा, तोपर्यंत कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये



हेही वाचा-

Live : रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा