Advertisement

अखेर प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे, रेल्वे ट्रॅक मोकळा


अखेर प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे, रेल्वे ट्रॅक मोकळा
SHARES

रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी सकाळी माटुंगा रेल्वे स्थानकावर केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे ऐन गर्दीच्यावेळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. पण अखेर पाच तासानंतर या प्रशिक्षणार्थींनी आंदोलन मागे घेतल्यानंतर रेल्वे सुरू झाली.


 

आंदोलनात मनसेची उडी

रेल्वेने प्रशिक्षणार्थी म्हणून मान्यता दिली खरी पण कोणत्याही रेल्वे भरतीमध्ये विचार केला जात नसल्याच्या विरोधात देशभरातले रेल्वे प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटिस) उमेदवार मंगळवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले. माटुंगा रेल्वे स्टेशनवर त्यांनी सकाळी ७ च्या सुमारास आंदोलन सुरू केलं. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. या आंदोलनामुळे रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने माटुंग्याहून जादा बसगाड्या सोडल्या.


दरम्यान या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेनेही उडी घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आंदोलनस्थळी दाखल होत आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चासुद्धा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दाखवत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

हे आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलक प्रशिक्षणार्थींंशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण प्रशिक्षणार्थी रुळावरुन हटण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.


 

रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

या विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्याचं पाहून रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली. 'या प्रशिक्षणार्थी रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल. यासाठी त्यांनी ३० मार्च पर्यंत अर्ज भरून सादर करायचे आहेत', अशी माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ सुनील उदासी यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.


अखेर आंदोलन मागे

दरम्यान खासदार राहुल शेवाळेंनी मध्य रेल्वेच्या डीआरएमशी करत 'रेल्वेत १२४०० जागा रिक्त असून ३१ मार्चपर्यंत प्रवेश परीक्षा घेतली जाईल असं आश्वासन खासदार राहुल शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी हे आंदोलन मागे घेतलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा