'परे'च्या बम्बार्डियर लोकलच्या वेगात होणार वाढ

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता जलद होणार आहे. पश्चिम रेल्वेवर नव्यानं धावत असलेल्या बम्बार्डियर लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतितास ७० किलोमीटरवरून प्रतितास ९० किलोमीटर वेगानं या गाड्या धावणार आहेत. नवीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

६३ बम्बार्डियर लोकल

पश्चिम रेल्वेवर नवीन ६३ बम्बार्डियर लोकल कार्यरत असून त्यांची कमाल क्षमता प्रतितास ११० किलोमीटर इतकी आहे. मात्र, जलद मार्गावर या लोकलचा वेग प्रतितास ८० ते १०० किमी असून धिम्या मार्गावर मात्र प्रतितास ७० किलोमीटर आहे. नव्या वर्षांपासून बम्बार्डियर लोकलचा वेग हा मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली स्थानकादरम्यान ७० ऐवजी प्रतितास ९० एवढा असणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

९० किमी प्रतितास

बम्बार्डियरचा वेग सुमारे ९० किमी प्रतितास केला जाणार असल्यानं प्रत्येक लोकल फेरीचा वेग प्रतितास २० किलोमीटर इतका वाढणार आहे. त्यामुळं बोरीवली पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.


हेही वाचा -

महापालिकेच्या 'या' रुग्णालयाला १६ रुपयांनी कांदे

स्विगीवर बिर्यानीची क्रेझ, एका मिनिटात येतात 'इतक्या' ऑर्डर


पुढील बातमी
इतर बातम्या