मिनी एसी बेस्ट बसला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेस्ट प्रशासनानं मागील अनेक वर्षांपासून घटलेली प्रवासी संख्या भरून काढण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु, तरिही प्रवाशी संख्या वाढत नव्हती. त्यामुळं बेस्टनं गतवर्षी प्रवासी तिकीटच्या किंमतीत कपात केली. त्यानुसार, साध्या बसच्या ५ कि.मी, प्रवासासाठी ५ रुपये व एसी बससाठी ६ रुपये असे तिकीटदर कमी करण्यात आले.

अवघ्या ६ रुपयांत गारेगार प्रवास करण्यास मिळत असल्यानं बेस्ट उपक्रमाच्या एसी बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशा ४२० एसी मिनी बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत. एसी बस सेवेची मागणी वाढत असल्यानं आणखी काही नवीन बस मार्ग बेस्ट प्रशासनानं गुरुवारपासून सुरू करण्यात आले.

प्रवासी भाड्यामध्ये कपात केल्यानंतर बेस्ट उपक्रमानं सप्टेंबर २०१९ मध्ये एसी मिनी बस आणल्या. त्यानुसार सप्टेंबर ते जानेवारी या काळात मिनी बसमधून तब्बल ४८ लाख प्रवाशांनी आतापर्यंत प्रवास केला आहे. छोट्या मार्गांवर म्हणजे घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत या बस चालविण्यात येणार आहेत. जुलै २०१९ पासून बेस्ट उपक्रमानं प्रवासी भाडं किमान ५ ते कमाल २० रुपये केलं आहे.

बेस्टनं एसी बसचा प्रवासही किमान सहा रुपये करण्यात आल्यानं मुंबईकरांची बस थांब्यांवर गर्दी होऊ लागली. प्रवाशांकडून एसी मिनी बसची मागणी प्रचंड वाढली आहे. दर १० मिनिटांनी या बस चालविण्यात येत असल्यानं प्रवाशांना बस थांब्यांवर तिष्ठत राहावं लागत नाही आहे. मिनी एसी बससेवा सप्टेंबर २०१९ मध्ये बेस्ट उपक्रमानं दक्षिण मुंबईतून सुरू केली.

या भागात एसी सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बेस्ट उपक्रमानं अन्य मार्गांवर ही मिनी वातानुकूलित बस सेवा सुरू केली. शेअर टॅक्सीसाठी प्रवाशांना किमान १० रुपये मोजावे लागतात. त्यावेळी एसी बसमधून अवघ्या ६ रुपयांत प्रवास करता येतो. तसंच, बेस्ट उपक्रमानं रेल्वे स्थानकांना जोडूनच ही बस सेवा ठेवल्यामुळं प्रवाशांना सोयीचं ठरत आहे.

नवीन एसी मिनी बस मार्ग

  • ए-२५८ गोरेगाव बस स्थानक(प.) ते राम मंदिर स्थानक - मोतीलालनगर, भगतसिंहनगर, बेस्टनगर मार्गे सकाळी ६.३० ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)

  • ए-२११ वांद्रे बस स्थानक (प.) ते चुईम गाव सकाळी ६ ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)

  • ए-२१४ वांद्रे बस स्थानक (प.) ते माउंट मेरी स्टेप्स सकाळी ६ ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)


हेही वाचा -

CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाची परीक्षा टॅबवर


पुढील बातमी
इतर बातम्या