एसटी महामंडळ हॉटेल चालकांकडून आकारणार जादा दर

एसटीच्या कोणत्याही बसमधून प्रवास करताना प्रवासादरम्यान थांबा घेणाऱ्या ठिकाणावरील हॉटेल चालकांकडून जादा दर आकारण्यात निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. तसंच, सणांच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळानं जादा एसटी थांबे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दरवाढ

हॉटेल चालकांकडून जादा दर आकारण्याच्या निर्णयानुसार, एसटी महामंडळानं २५ मेपासून मुंबई-पुणे-मुंबई महामार्गावर चालविण्यात येणाऱ्या शिवशाही, निमआराम गाडी आणि एसटी गाड्यांना ही दरवाढ लागू केली आहे. शिवनेरी, शिवशाही, निमआराम आणि साध्या एसटीसाठी वेगवेगळे दर हॉटेल चालकांकडून आकारण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील थांब्यासाठी एसटीनं नवे दरपत्रक जाहीर केलं आहे. याआधी शिवनेरी आणि शिवशाहीसाठी २३६ रुपये आकारले जात होते. आता २६० रुपये आकारले जाणार आहेत. निमआराम गाड्यांसाठी आधी १८९ रुपये आकारले जात होते. आता २०८ रुपये आकारले जाणार आहेत. तसंच, साध्या एसटीसाठी आता १४२ रुपयांऐवजी १५६ रुपये आकारले जाणार आहेत.

जादा थांबे

त्याशिवाय, एसटी बसच्या मार्गावर जादा थांबे उभारल्यास गणेशोत्सवासह इतर सणांच्या काळात थांब्यांवर होणारी गर्दी विभाजित होणार आहे. शीव रुग्णालय, वाशी महामार्ग, सीबीडी बेलापूर, खारघर या ठिकाणी नव्या एसटी थांब्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या थांब्यांवर पाणी, आसनव्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी ९ लाख ३० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा -

मुंबईत तब्बल ४९९ इमारती असुरक्षित

मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार


पुढील बातमी
इतर बातम्या