कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ४ दिवस टोलमाफी

गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान पूर्णपणे टोलमाफी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी मंत्रालयात केली. या सवलतीनुसार गणेशभक्तांना शुक्रवारपासून मुंबईतील आरटीओ, रस्ते वाहतूक आणि पोलिस ठाण्यात विशेष पास उपलब्ध करून देण्यात येतील.

कुठल्या मार्गांवर टोलमाफी?

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसंच मुंबई-गोवा, पाली खोपोली मार्गे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. गणेशोत्सव-२०१८ कोकण दर्शन असे स्टीकर पोलिस विभाग व प्रादेश‍िक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांना देण्यात येणार आहेत.

एसटीलाही टोलमाफी

कोकणात जाणाऱ्या मार्गांवरील सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून खासगी वाहनांसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ही टोलमाफी लागू असेल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

विशेष यंत्रणा

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर खास यंत्रणा उभारण्यात येईल. वाहतूककोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त ट्राफिक वॉर्डन तसंच वाहतूक पोलिस आण‍ि डेल्टा फोर्स या कर्मचाऱ्यांची कुमक वाढवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


हेही वाचा-

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर


पुढील बातमी
इतर बातम्या