आयआरसीटीसी वरून बुक करा शिर्डीसाठी व्हीआयपी तिकीट

साई बाबांच्या दर्शनासाठी रेल्वेनं शिर्डीला जाणाऱ्या भक्तांना रेल्वे प्रशासनानं खास भेट दिली आहे. शिर्डीला गेल्यानंतर साई बाबांच्या दर्शनासाठी आता लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज रेल्वेनं शिर्डीस जाणाऱ्या भक्तांना आता लागणार नाही. कारण रेल्वेकडून रेल्वे तिकीटाबरोबरच आता साई बाबांचं दर्शन घेण्यासाठीचं तिकीटही बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. २६ जानेवारीपासून या सुविधेला सुरूवात होणार असून रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा शिर्डीत लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या साई भक्तांना होणार आहे.

आॅनलाईन दर्शन तिकीट

रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या निर्णयानुसार शिर्डीचं तिकीट बुक केल्यानंतर दर्शन तिकीटाचा पर्याय येईल. हा पर्याय निवडत व्हीआयपी दर्शन तिकीट बुक करता येईल. मात्र त्यासाठी किमान दोन महिने आधी तिकीट बुक करावं लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच व्हिआयपी दर्शन तिकीटाची सेवा मिळणार आहे. तर शिर्डी स्थानकात पोहचल्यापासून पुढील ४८ तास आॅनलाईन दर्शन तिकीटाची वैधता असणार आहे. त्यामुळे शिर्डीत पोहचल्यापासून ४८ तासांत दर्शन घेणं गरजेचं ठरणार आहे.

आता रांग विसरा

शिर्डी साई नगर, कोपरगाव, मनमाड, नाशिक आणि नागरसोल या स्थानकांचं ई-तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना-भक्तांनाच दर्शनासाठी आॅनलाईन दर्शन तिकीट बुक करता येणार हे ही महत्त्वाचं. या दर्शन तिकीटामुळे भक्तांना आता तासनतास रांगेत उभं राहावं लागणार नसल्यानंही रेल्वेचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान तिरूपती, सिद्धीविनायक आणि रामेश्वर दर्शनासाठीही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा विचार असल्याचंही समजतं आहे.


हेही वाचा

अपघातग्रस्तांच्या मदतीला आता पश्चिम रेल्वेची 'आझाद ब्रिगेड'

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक

पुढील बातमी
इतर बातम्या