पश्चिम रेल्वेच्या ३६ स्थानकांमध्ये आधुनिक उद्यानं

रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागा वापरात आणण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं उपाययोजना आखली आहे. पर्यावरणाचा समतोल राहील असे उद्यान उभारण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेच्यावतीनं करण्यात येत आहेत. मुंबईतील लोकल स्थानकांच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी स्थानकाच्या परिसरात आधुनिक उद्यानं उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मुंबईतील ३६ रेल्वे स्थानकांवर ही उद्यानं उभारण्यात येणार आहेत. आगामी मार्च २०२० पर्यंत ही उद्यानं उभारण्यात येणार आहेत.

पर्यावरणपूरक उर्जेचा वापर

रेल्वे स्थानकातील ३० टक्के भागामध्ये हे उद्यान उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय, या स्थानकांना ISO 14001:2015 हे प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेत असणाऱ्या जागांवर उद्यानं उभारण्यासह पर्यावरणपूरक उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. अधिकाधिक पर्यावरणस्नेही बाबींनीयुक्त असे हे उद्यान असणार आहे. तसंच, तिकीट घराजवळील खिडकी, प्लॅटफॉर्मजवळील जागा, अथवा मोठ्या पादचारी पूलाच्या एका भागात हे उद्यान उभारणार असल्याची माहिती मिळते.

नियमांचं पालन

पर्यायी साधनांचा वापर करून ऊर्जा बचत, परिसरात स्वच्छता ठेवणं, हिरवीगार झाडं, सुका आणि ओला कचरा यांचं वर्गीकरण, सौर ऊर्जेचा वापर, आधुनिक पद्धतीचं तिकिट घर आदींबाबतच्या एकूण १२ विभागांच्या नियमांचं पालन झाल्यास रेल्वे स्थानकाला ISO 14001 हे प्रमाणपत्र दिलं जातं. नुकतंच मुंबई सेंट्रल स्थानकाला हे प्रमाणपत्र देण्यात आलं. आता पश्चिम रेल्वेच्या ३६ स्थानकांना यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे.

या स्थानकांत उद्यानं

चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम, खार रोड, वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव रोड, वसई रोड, नालासोपारा, पालघर, बोईसर, विरार, उंबरगाव, वापी, बिलीमोरा, उधवाडा, नवसारी, उधना आणि सूरत या स्थानकांच्या परिसरात उद्याने उभारण्यात येणार आहे.


हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

कल्याण-डोंबिवली लोकल बंद


पुढील बातमी
इतर बातम्या