Coronavirus Updates: रेल्वे रद्द; प्रवाशांच्या खात्याच पैसे जमा

एक्स्प्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे. १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण २१ लाख २३ हजार प्रवाशांना १३४ कोटी ४८ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

या कालावधीत मुंबई विभागातून ९ लाख प्रवाशांना पश्चिम रेल्वेनं ६३ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळं भारतीय रेल्वे मार्गावर एकही प्रवासी वाहतूक सेवा सुरू नाही. प्रवाशांचा प्रवास रद्द होत आहे. 

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी २-३ महिन्यांअगोदर काढलेलं तिकीट पश्चिम रेल्वेकडून रद्द केलं जात आहे. या प्रवाशांना तिकीट परतावा दिला जात आहे. १ मार्च ते ३१ मार्च कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे. पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. तर मागील ४ दिवसात २२ हजार ४२७ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून २ कोटी २३ लाख रुपये परतावा देण्यात आला.

१ मार्च ते ४ एप्रिल कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण ९ लाख ३५ हजार ५०९ प्रवाशांनी तिकीट रद्द केलं आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेनं ६३ कोटी ४८ लाख रुपये परतावा केला आहे. १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ९ लाख २३ हजार ६४५ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ६२ कोटी ४९ लाख रुपये परतावा देण्यात आला. तर मागील ४ दिवसात ११ हजार ८६४ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ९८ लाख २४ हजार रुपये परतावा देण्यात आल्याची माहिती मिळते.


हेही वाचा -

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रिक्षावाल्यांची मोफत सेवा

बेस्टप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांनाही हवा प्रोत्साहनभत्ता; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या