पश्चिम रेल्वेवर लवकरच भारतीय बनावटीच्या मेधा लोकल 'मेधा' लोकल धावणार आहेत. तर, मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकल धावणार असल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हैदराबादच्या मेधा सर्व्हे ड्राईव्ह या कंपनीने मेधा लोकलची विद्युत यंत्रणा आणि मोटार तयार केली आहे.
पश्चिम रेल्वेवर लवकरच दाखल होणाऱ्या 13 मेधा लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार होत्या. पण, काही तांत्रिक अचडणींमुळे मेधा लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणार आहेत. तर, मध्य रेल्वेवर त्या बदल्यात 13 बम्बार्डियर देण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर दाखल होणाऱ्या 13 पैकी 1 लोकल मुंबईत आली असून मेधा लोकल लवकरच सेवेत दाखल होणार आहे. तर, 10 डिसेंबरपर्यंत आणखी चार लोकल दाखल होणार आहेत.
रेल्वेच्या चेन्नईतील आयएफसी कारखान्यात मेधा लोकल तयार केल्या जात आहेत. तसंच, बम्बार्डियर, सिमेन्स लोकलचे उत्पादन आयसीएफ कारखान्यात केले जात असून मेधातील बाह्य आणि अंतर्गत काम भारतीय कंपन्यांनी केले आहे. या लोकलमधील अंतर्गत विद्युत यंत्रणा आणि मोटार हैद्राबादमधील मेधा सर्व्हे ड्राइव्ह या कंपनीने उत्पादित केली आहे. मेधा लोकलची किंमत जवळपास ४३ कोटी रुपये आहे. तसेच या लोकलचा कमाल वेग ११० किमी प्रतितास इतक्या क्षमतेचा आहे.
मध्य रेल्वेवर मेधा लोकलचा ताफा येणं अपेक्षित असताना त्याऐवजी पश्चिम रेल्वेवर त्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्याबदल्यात मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकल पुरवण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील येणाऱ्या काही बम्बार्डियर लोकल भविष्यात हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.