पश्चिम रेल्वेनेकडून गुड न्यूज! लोकलमध्ये महिलांचे डबे वाढवले

पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १२ डब्यांच्या लोकलमधील अकराव्या डब्याचा काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे आता लोकलमध्ये चौथा डबाही महिलांसाठी उपलब्ध झाला आहे. द्वितीय श्रेणीच्या या डब्यात महिला प्रवाशांना अतिरिक्त २५ आसने मिळाली आहेत.

चर्चगेट दिशेच्या अकराव्या द्वितीय श्रेणीच्या डब्यामध्ये विभाजन करण्यात आले आहे. या डब्यातील काही भाग महिला प्रवाशांसाठी २४ तास राखीव असणार आहे. पुरुष प्रवाशांनी या डब्यातून प्रवास केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संघटनांनी महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त महिला विशेष लोकल आणि अतिरिक्त महिला डबे जोडण्याची मागणी केली होती. या मागणीची वैधता तपासण्यासाठी पश्चिम रेल्वेवर महिला-पुरुष प्रवासी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात महिला प्रवाशांचा टक्का काही अंशांनी वाढल्याचे दिसून आले, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनापूर्व काळात २०१९ मध्ये पश्चिम रेल्वेवरील एकूण प्रवासी संख्येत पासधारक महिला प्रवाशांचे प्रमाण २४.३८ टक्के होते. पासधारक पुरुष प्रवाशांचे प्रमाण ७५.६२ इतके होते.

कोरोनानंतर घरातून काम करण्याची मुभा बंद झाल्यामुळे २०२२ मध्ये महिला प्रवासी संख्या ०.२६ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ (सप्टेंबर)मध्ये महिला प्रवासी संख्येचे प्रमाण २४.६४ टक्के इतके झाले आहे, तर पुरुष प्रवाशांचे प्रमाण ७५.३६ टक्के असे घटले. यामुळे महिला प्रवासी आसनांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१२ डबा लोकलमधील प्रवासी आसन क्षमता

  • एकूण आसन क्षमता : १,१७०
  •  आधीची महिला आसन क्षमता : २७३ (२३.३३ टक्के)
  • आता महिला आसन क्षमता : २९८ (२५.४७ टक्के)

रेल्वेने २०१७ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मध्य-पश्चिम मार्गावरील ७५ लाखांपैकी २२ टक्के अर्थात १६.५ लाख प्रवासी महिला आहेत. मध्य रेल्वेवर एकूण ८.५८ लाख महिला प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवर ७.५ लाख महिला प्रवासी आहेत. आता महिला प्रवाशांची आकडेवारी २५ लाखांच्या जवळ पोहचली आहे.


हेही वाचा

CSMT सोबतच ‘या’ दोन स्थानकांचं रुपडं पालटणार! प्रवाशांसाठी 'या' सुविधा

पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त 12 नॉन एसी, 31 एसी सेवा १ ऑक्टोबरपासून सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या