फुकट्या प्रवाशांकडून परेने वसूल केला 7 कोटी 19 लाखांचा दंड!

पश्चिम रेल्वे मार्गावरुन फुकटात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध पश्चिम रेल्वेने 1 लाख 83 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यातून परेने 7 कोटी 19 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसंच, या महिन्यात 876 भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आलं आहे. तर, 150 जणांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच स्वत:चं आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणं, विना तिकीट प्रवास करणं अशा घटनांची संख्याही वाढली आहे, हे पुन्हा एकदा या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.

शिवाय, पश्चिम रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये 218 जणांना पकडण्यात आलं असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसंच, 12 वर्षांखालील 55 विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आलं. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.


हेही वाचा

एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: मरेच्या ६ तर, परेच्या ४ पुलांचं ऑडिट

पुढील बातमी
इतर बातम्या