
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ (W-DFCC) शी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जोडले गेल्यानंतर, मुंबई (mumbai) विभागातून पहिल्यांदाच ‘डबल स्टॅक कंटेनर रेक’ म्हणजेच एकावर एक कंटेनर लोड केलेली मालगाडी यशस्वी रवाना करण्यात आली आहे.
20 जून 2026 रोजी या ऐतिहासिक कामगिरीची नोंद रेल्वे प्रशासनाने केली आहे. ही पहिली डबल स्टॅक मालगाडी जेएनपीटीहून पश्चिम रेल्वेच्या संजण रेल्वे स्थानकाद्वारे सेवा पुरवल्या जाणाऱ्या ‘संजण स्पीड शक्ती मल्टी-मॉडेल टर्मिनस’साठी रवाना झाली.
या गाडीमध्ये 45 अत्याधुनिक ‘बीएलसीएम’ वॅगन्स जोडण्यात आल्या होत्या. 20 जून रोजी या वॅगन्सचे लोडिंग पूर्ण झाले आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 21 जून रोजी ही गाडी जेएनपीटीहून मार्गस्थ झाली.
या एकाच गाडीतून एकूण 180 टीईयू कंटेनरची वाहतूक करण्यात आली आहे. तसेच त्याचे एकूण वजन 2,544.07 टन आहे. या मालगाडीने वेस्टर्न डीएफसीसी मार्गावरून 232 किलोमीटरचा प्रवास केला.
विशेष म्हणजे, जेएनपीटी (JNPT) येथून हे डबल स्टॅक कंटेनर ऑपरेशन्स सुरू होण्यासोबतच, 20 जून रोजी आणखी दोन वेगवेगळ्या मार्गांवरही अशाच प्रकारच्या डबल स्टॅक कंटेनर गाड्या चालवण्यात आल्या आहेत.
यामध्ये जेएनपीटी ते दिल्ली मंडळातील गढी हरसरू आणि जेएनपीटी ते वडोदरा मंडळातील छोटा उदेपूर या दोन गाड्यांचा समावेश आहे.
जेएनपीटी बंदर टर्मिनल्सवरून थेट वेस्टर्न डीएफसीसी मार्गे धावणाऱ्या या डबल स्टॅक कंटेनर गाड्यांमुळे मालवाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. यामुळे बंदराची कार्यक्षमता अधिक मजबूत होईल.
हा महत्त्वाकांक्षी उपक्रम देशातील लॉजिस्टिक क्षेत्राला बळकट करण्यासाठी, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय रेल्वे योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'पीएम गतिशक्ती' मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा
