कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स आणि बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिम, स्विमिंग पूल १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यासोबतच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे.
पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं आणि हॉटेल्सही १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्पा आणि स्पोर्टसही या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. इतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्यानं त्या ठिकाणी कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेले नियमच बंधनकारक राहणार आहेत.
१००% क्षमतेनं काय सुरू होणार?
सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने आदी.
शिथिलता देण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू करू शकतात. सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेनं सुरू करू शकतात, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकलं आहे. या ए श्रेणीतील जिल्ह्यातील ९० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ७० टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे.
तसंच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट १० टक्के आहे. तसंच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे.
हेही वाचा