
शाळेत यायला दहा मिनिटे उशिर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्याने वसईतील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या मृत्यूची प्रथमिक चौकशी करण्यात यावी, उच्च न्यायालयाच्या न्यायीक निबंधकांनी मंगळवारी मीरा भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलीस आयुक्तांना हे आदेश दिले आहेत.
एका महिला वकिलाने मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून या प्रकरणाची स्वत:हून दखल घेण्याचे आणि प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायीक निबंधकांनी उपरोक्त आदेश दिले.
वसई-विरार आणि मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त तसेच वसई-विरार महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच संबंधित महिला वकिलाला चौकशीच्या तपशीलाबाबत लवकरात लवकर माहिती द्यावी, असे आदेश न्यायीक निबंधकाने दिले आहेत.
काजल गौड या सहावीत शिकणाऱ्या मुलीसह अन्य काही विद्यार्थ्यांनाही 8 नोव्हेंबर रोजी शाळेत उशिरा पोहोचल्याने पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती.
शाळेतून घरी परतल्यानंतर काजल हिला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. सुरूवातीला तिला वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर प्रकृती बिघडल्याने तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, 14 नोव्हेंबर तिचा मृत्यू झाला.
