जिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती

टॅलेंटने ओतप्रोत भरलेल्या डीआयडी लिटील मास्टर्सचा ग्रँड फिनाले रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्या मनमोहक डान्सने सर्वांना मोहित करणाऱ्या हैद्राबादच्या जिया ठाकूरने डीआयडी लिटील मास्टरच्या ट्रॅाफीवर आपलं नाव कोरत बाजी मारली.

SHARE

झी टीव्हीवर सुरू असलेल्या डीआयडी लिटील मास्टर्सच्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण बनणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. टॅलेंटने ओतप्रोत भरलेल्या डीआयडी लिटील मास्टर्सचा ग्रँड फिनाले रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्या मनमोहक डान्सने सर्वांना मोहित करणाऱ्या हैद्राबादच्या जिया ठाकूरने डीआयडी लिटील मास्टरच्या ट्रॅाफीवर आपलं नाव कोरत बाजी मारली.

डीआयडी लिटील मास्टर्सच्या पहिल्या पर्वात विजेती ठरलेली वैष्णवी पाटील ही जियाची मेंटॅार होती. विजेतेपदाची ट्रॅाफी उंचावल्यावर मुंबई लाइव्हशी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना जिया म्हणाली की, “फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी मी डान्सच्या रिहर्सलवर खूप मेहनत घेतली होती. अखेर आज माझ्या मेहनतीचं चीज झालं. डीआयडी लिटील मास्टर्सची ट्रॅाफी जिंकल्याने आज मी खूप उत्साहीत आहे.”

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या मन अमित, उर्वा भावसार, तमन गमनू आणि ए. पी. रॅाकर्स या प्रतिस्पर्ध्यांना मात देत जियाने हे यश मिळवलं आहे. अवघं ८ वर्षे वय असलेली जिया विजेतेपणाचा क्षण अनुभवण्याबाबत म्हणाली की, “ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेले आम्ही पाचही स्पर्धक आपापल्या मेंटॅारसोबत एका रांगेत उभे होतो. पाचव्या क्रमांकापासून नावं घोषित करायला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी मी थोडीशी नर्व्हस झाले होते, पण जेव्हा माझं नाव विजयी म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा मी आणि वैष्णवीदीदी दोघींनी रडायलाच सुरुवात केली. कारण त्या क्षणी आम्ही उत्साहीतही होतो आणि भावूकही...”

डीआयडी लिटील मास्टर बनलेल्या जियाचा आत्मविश्वास स्वगृही भेट देऊन आल्यानंतर खूप वाढला होता. घरी परतण्याचा सुरेख अनुभव जियासाठी फायदेशीर ठरला. फॅालोअर्स आणि त्यांचा सपोर्ट पाहून तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने ग्रँड फिनालेमध्ये बाजी मारली. डीआयडी लिटील मास्टर्सच्या प्रवासात आपल्याला फॅालो करणाऱ्या, मत देणाऱ्या तसंच सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे जियाने मनापासून आभार मानले.

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या सर्वच स्पर्धकांनी धडाकेबाज परफॅार्मन्स सादर करत शोमध्ये रंगत आणली. फिनालेच्या या भागाचं सूत्रसंचालन जय भानुशाली, इंडियाज बेस्ट ड्रामेबाजची माजी स्पर्धक तमन्ना आणि डान्सर-अॅक्टर शंतनू महेश्वरी यांनी केलं, जे झी टीव्हीवरील इंडियाज बेस्ट ड्रामेबाजचं तिसरं पर्वही होस्ट करणार आहे. पुढील आठवड्यापासून हा शो आॅन एअर जाणार आहे.

चित्रांगदा सिंग, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि कोरिओग्राफर मर्झी पेस्टनजी हे डीआयडी लिटील मास्टरच्या चौथ्या पर्वाचे परीक्षक होते. नंतर चित्रांगदाची जागा कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान यांनी घेतली.

मुंबई लाइव्हच्या वतीने अभिनंदन, जिया!

संबंधित विषय
ताज्या बातम्या