Advertisement

ध्येयवेड्या तरुणाच्या जिद्दीची कहाणी

’३१ दिवस’ या सिनेमामागील विचार चांगला आणि प्रेरणादायी आहे. पण मांडणीमध्ये फसगत झाल्याने सिनेमाच्या माध्यमातून तो विचार नीट पोहोचत नाही.

ध्येयवेड्या तरुणाच्या जिद्दीची कहाणी
SHARES

एखाद्या चांगल्या विचारावर आधारीत असलेला सिनेमा सर्वांनाच भावतो. पण त्याला उत्तम पटकथा, संवाद आणि सादरीकरणाची जोड देणं खूप गरजेचं असतं. ’३१ दिवस’ या सिनेमामागील विचार चांगला आणि प्रेरणादायी आहे. पण मांडणीमध्ये फसगत झाल्याने सिनेमाच्या माध्यमातून तो विचार नीट पोहोचत नाही.

पटकथेच्या मांडणीचा फटका 

प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या आशिष भेलकर यांनी एका चांगल्या वनलाईनवर हा सिनेमा बनवला असला तरी पटकथेच्या मांडणीचा फटका या सिनेमाला बसला आहे. सिनेमाचा विषय आणि शीर्षकाचा आशय काय आहे? दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे? ३१ दिवस हे शीर्षक कशासाठी दिलं? या प्रश्नांचा विचार करून डोक्याचा पार भुगा होतो तरी त्याचा उलगडा होत नाही. मध्यंतरानंतरही बराच काळ लोटल्यानंतर शीर्षकाचा उलगडा होतो. तोपर्यंत फार उशीर होतो.


संघर्षमय जीवन

मकरंद सावंत (शशांक केतकर) या ध्येयवेड्या तरुणाची कथा या सिनेमात आहे. वडील बँकेत मॅनेजर (विवेक लागू) आणि आई (सुहिता थत्ते) गृहिणी असलेल्या दाम्पत्याचा हा मुलगा एकांकिका दिग्दर्शित करण्यात रमलेला असतो. एक दिवस सिनेमाचा दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मकरंदच्या जीवनात मुग्धा (मयुरी देशमुख) येते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागतात. दुसरीकडे एका अंध शाळेची मुख्याध्यापिका मीरा (रीना अगरवाल) आपल्या विद्यार्थ्यांना नाटक शिकवण्यासाठी मकरंदला बोलावते. मीराही अंध असल्याने मकरंद तिच्या विद्यार्थ्यांचं नाटक बसवतो. मकरंदचं लग्न होतं, अचानक वडील जातात, सर्व जबाबदारी त्याच्यावर येते. बाळही होतं. अशातच त्याला एक अपघात होतो. त्यानंतरही तो कसा संघर्ष करत स्वत:ला सिध्द करतो ते सिनेमात पाहायला मिळतं.


मांडणी करताना गफलत

पटकथेची मांडणी अशा प्रकारे केली आहे की, मुख्य मुद्दा खूप उशीरा समोर येतो. बेस तयार करण्यात खूप वेळ गेला आहे. खरं तर हा वेळ वाया गेला असं म्हणता येणार नाही. कारण ते गरजेचंही होतं. त्यामुळेच मांडणी करताना गफलत झाल्यासारखी वाटते. सिनेमा सुरू झाल्यापासून वेगात पुढे सरकत जातो. नायकाच्या आयुष्यातील घडामोडी वेगात घडतात. त्यामुळे कंटाळा येत नाही, पण काही ठिकाणी गाणी कथेला डिस्टर्ब करतात. नायकाच्या बहिणीच्या लग्नातील हळदीच्या गाण्याला काही ताळतंत्रच नाही. अचानक येतं आणि जातंही. काही सीन अर्ध्यावरच कट होतात. त्यामुळे संकलनात थोडीशी ढिलाई झाल्याचं जाणवतं.


क्लायमॅक्स जबरदस्त

सिनेमात मीराची एंट्री खूप लवकर होते आणि नंतर ती गायबच होते. तिच्या अंध असण्याचा काहीतरी संबंध पुढे घडणाऱ्या घटनांशी असू शकतो, याचा अंदाज तेव्हाच येतो. लोकेशन्स, कॅमेरावर्क, फाईट सीन्स या जमेच्या बाजू आहेत. कितीही संकटं आली तरी ‘शो मस्ट गो आॅन’ असं म्हणत जिद्दीनं आपली वाटचल सुरूच ठेवली तरच यश पायाशी लोळण घेऊ शकतं हा सकारात्मक विचार या सिनेमात आहे. त्यासाठी दिग्दर्शकाने एका अशक्यप्राय वाटाव्या अशा संकल्पनेचा आधार घेतला आहे.  पण तो पडद्यावर नेटकेपणाने उतरवताना गडबड झाली आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. मराठीमध्ये अशा प्रकरचा क्लायमॅक्स पाहायला मिळणं आणि त्यासाठी इतकी मेहनत घेतली जाणं असं अभावानेच घडतं.


मयूरी - शशांकची केमिस्ट्री

शशांक केतकरने डोळस आणि अंध असे मकरंदचे दोन्ही पैलू अचूकपणे सादर केले आहेत. दृष्टी गमावल्यावर आपण एका अंधाऱ्या कोठडीत अडकलो आहोत याची जाणीव करून देणाऱ्या दृश्यांमध्ये त्याने जीव ओतला आहे. मयूरी देशमुखने त्याला उत्तम साथ दिली आहे. प्रत्येक पावलावर पतीच्या मागे सावलीप्रमाणे उभी राहणाऱ्या मयूरीची शशांकसोबतची केमिस्ट्रीही छान जुळली आहे. रीना अगरवालने अंध तरुणीची भूमिका यशस्वीपणे साकारली असली तरी संवादफेकीतील तिचे उच्चार काहीसे खटकतात. राजू खेर यांनी एका प्रामाणिक निर्मात्याची भूमिका साकारली आहे. त्यांच्या जोडीला विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे यांनी छोट्याशा भूमिकांमध्येही चांगलं काम केलं आहे.


एका चांगल्या संकल्पनेवर आधारित असलेला, तसंच सकारात्मक विचार देणारा हा सिनेमा आहे. काही कारणांमुळे हा प्रयत्न फसला असला तरी कलाकार-तंत्रज्ञांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे.

दर्जा - **१/२


सिनेमा - ३१ दिवस

निर्माता - भारथन सुरेश बाबू


दिग्दर्शक - आशिष भेलकर


कलाकार - शशांक केतकर, मयूरी देशमुख, रीना अगरवाल, राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे, नितीन जाधव, हीना पांचाळ, जीनल मिरानी



हेही वाचा - 

आपला ‘सैराट’च 'झिंगाट'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा