
मुंबई (mumbai) महापालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सुविधांना आता तंत्रज्ञानाचीही जोड उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ची (health chatbot) सुविधा पालिकेने (bmc) उपलब्ध करून दिली आहे.
या डिजिटल सुविधांचे लोकार्पण राज्याचे (maharashtra) माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार (ashish shelar) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने डिजिटल पुढाकार अंतर्गत नागरिकांना आरोग्य क्षेत्रासाठी चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डिजिटल पुढाकाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढवतानाच आरोग्य सुविधांची पोहच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित माहिती सहजशक्य आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते.
डिजिटल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे माहिती उपलब्ध होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
याचा एक भाग म्हणून डिजिटल पद्धतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासह अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल.
अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही पुढाकारांमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल तसेच आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन प्रसंगीचे निर्णय घेण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून ते संपूर्ण आरोग्य सेवांची माहिती देण्यासाठी 9892993368 हा चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या पुढाकार अंतर्गत आजाराबाबत जनजागृती, आरोग्य क्षेत्रातील मोहिमेची माहिती, नजीकची आरोग्य सुविधा, नोंदणीबाबत माहिती, आरोग्य प्रमाणपत्र तसेच परवान्याबाबतची माहिती देखील मिळणार आहे.
यासोबतच आरोग्य केंद्राच्या ठिकाणी भेटीची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्जाची माहिती, विवाह नोंदणीची माहिती, अपंगत्व प्रमाणपत्र, आरोग्य परवाने तसेच प्रसूतिगृहाशी संबंधित परवाने मिळवणे, ऑनलाइन नोंदणी आणि सेवा नोंदणी याची माहिती मिळणार आहे.
दरम्यान, येत्या काळात आरोग्य सुविधांचे संकेतस्थळ आणि डॅशबोर्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
