आता 'एटीएम'च तारणहार, बँक कर्मचारी संपावर

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • व्यवसाय

वेतनावाढीच्या प्रलंबित मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच देशभरातील १० लाखांहून अधिक कर्मचारी-अधिकारी संपावर गेले आहेत. यामुळे बँकांचा व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. महिनाअखेरीस बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने सगळा भार एटीएमवर पडणार आहे. एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवल्याचा दावा बँका व्यवस्थापनांकडून केला जात आहे. हा दावा किती खरा आणि खोटा हे आता या संपाच्या दोन दिवसाच्या काळात समोर येईल.

वेतनकराराचा प्रश्न प्रलंबित

बँक कर्चमारी-अधिकाऱ्यांचा वेतनकरार ३१ आॅक्टोबर २०१७ ला संपला असून हा करार नोव्हेंबर २०१७ मध्ये नव्यानं होणं अपेक्षित होतं. पण अजूनही वेतनकरार झालेला नाही. अशातच केंद्र सरकारनं बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांना केवळ २ टक्के इतकीच वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी अाहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी ९ संघटनांनी एकत्र येत 'युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन'च्या माध्यमातून २ दिवसीय संपाची हाक दिली.

मुंबईत बँकांचं शटर डाऊन

त्यानुसार बुधवारी ३० मे आणि गुरूवार ३१ मे असा दोन दिवस संप असणार असून सकाळपासूनच संपाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील सर्वच बँकांच्या शाखांचं शटर डाऊन असून बँक व्यवहार ठप्प आहेत.

१० लाख कर्मचाऱ्यांचा समावेश

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरातील ६ परदेशी बँका, २२ राष्ट्रीयकृत बँका आणि १८ खासगी बँका संपावर गेल्या असून या बँकातील तब्बल १० लाख कर्मचारी-अधिकारी संपावर गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवहार ठप्प झाला आहे.

'चुकीचं धोरणं रद्द करा'

केंद्र सरकारनं एकीकडे नाममात्र पगारवाढ देताना बँकांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारवाढीबाबत कोणतीही चर्चा करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं कर्मचारी-अधिकाऱ्यांमधील संताप वाढला आहे. २२ राष्ट्रीयकृत बँकांपैकी १८ राष्ट्रीयकृत बँका सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं तोट्यात असल्याचा आरोपही उटगी यांनी केला. ९ लाख कोटीच्या बुडीत कर्जामुळं या बँका तोट्यात असल्यानं अशी चुकीची धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

गुरूवारी फटका बसणार

एटीएममध्ये मावेल तितकी रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी बँक ग्राहकांना एटीएममधून रक्कम काढता येणार असली, तरु गुरूवारी एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी कर्मचारी-अधिकारी नसल्यानं रोख रकमेची चणचण भासेल. त्यामुळे गुरूवारी संपाचा फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा-

जीवनावश्यक वस्तू महागणार! मालवाहतूकदारांची २० टक्के दरवाढ

मुंबईत पेट्रोल ४ रूपयांनी मिळणार स्वस्त!


पुढील बातमी
इतर बातम्या