Advertisement

जीवनावश्यक वस्तू महागणार! मालवाहतूकदारांची २० टक्के दरवाढ

मुंबई मालवाहतूक महासंघानं जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक दरात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ येत्या १ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती महासंघाचे सहसचिव अमेय भोर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

जीवनावश्यक वस्तू महागणार! मालवाहतूकदारांची २० टक्के दरवाढ
SHARES

येत्या १ जूनपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चांगलाच फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण मुंबई मालवाहतूक महासंघानं जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक दरात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ येत्या १ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती महासंघाचे सहसचिव अमेय भोर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. ही दरवाढ लागू झाल्यास अन्नधान्य, भाजीपाल्यापासून ते औषधांपर्यंत सर्वच अत्यावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ होऊन सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.



सलग इंधनदरवाढीने हैराण

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याने सर्वसामान्य हैराण झाले अाहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५.६५ रुपये, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ७३.२० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. या डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूकदारांवरील आर्थिक भार वाढला आहेच. पण त्याचसोबत गेल्या वर्षभरात गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आणि देखभालीचा खर्चही वाढला आहे. वाढलेल्या टोल दरांनीही मालवाहतूकदारांना हैराण केलं आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मालवाहतूकदराच्या खर्चात २० ते ३० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.



बैठकीत निर्णय

हा अतिरिक्त खर्च भरून का़ढण्यासाठी शुक्रवारी महासंघाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील मालवाहतुकीचे दर २० टक्क्यांनी वाढवून त्याची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भोर यांनी स्पष्ट केलं.


दरवाढ कुणाला लागू?

५ टनापेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या वाहतूकदरामध्ये ही वाढ होणार आहे. तर मुंबईपाठोपाठ राज्यातील वाहतूकदारही टप्प्याटप्प्याने ही दरवाढ करणार आहेत. येत्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडणार हे निश्चित. भोर यांनी ही याला दुजोरा दिला आहे.



विक्रेत्यांचा भार सर्वसामान्यांवर

भाजीपाला, फळं, दूध, धान्य, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चढ्या दरात झाली तर साहजिकच विक्रेत्यांवर त्याचा भार पडणार असल्यानं ते हा भार ग्राहकांच्या माथी मारणार. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजीपाला, फळ, दूध, धान्य अशा वस्तूंचा कृत्रिम तुटवडा होऊन किंमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

मंथएन्डला बॅंका २ दिवस बंद, १० लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा