Advertisement

मंथएन्डला बॅंका २ दिवस बंद, १० लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

३० आणि ३१ मे रोजी एटीएमवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी देशभरातील बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. या संपामध्ये १० लाख बँक अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार असून परिणामी बँकांचे सर्व व्यवहार २ दिवसांसाठी ठप्प राहणार आहे.

मंथएन्डला बॅंका २ दिवस बंद, १० लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
SHARES

कर्नाटक निवडणुकांच्या काही दिवस आधी देशातील कित्येक राज्यांमधील एटीएममध्ये खडखडाट होता. आता कुठं एटीएमची परिस्थितीत सुधारत असताना पुन्हा मंथएन्डला म्हणजेच ३० आणि ३१ मे रोजी एटीएमवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी देशभरातील बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. या संपामध्ये १० लाख बँक अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार असून परिणामी बँकांचे सर्व व्यवहार २ दिवसांसाठी ठप्प राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


वेतनवाढीचा निर्णय प्रलंबित

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या ७-८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वेतनवाढीचा करार ३१ आॅक्टोबर २०१७ ला संपला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ त्वरीत म्हणजेच नोव्हेंबर २०१७ पासून होणं अपेक्षित होती. पण अजूनही वेतनवाढ झालेली नाही.



९ बँक संघटना सामील

त्यातच बँक कर्मचाऱ्यांना २ टक्के इतकी वेतनवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ही नाममात्र वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यानं सरकारच्या या निर्णयाविधोता युनायटेड फोर आॅफ बँक युनियन्सतर्फे दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार देशभरातील एकूण ९ बँक संघटना या संपात सहभागी होणार असल्याचंही उटगी यांनी स्पष्ट केलं आहे.


सरकारचं कारण चुकीचं

देशातील बँकांची स्थिती वाईट असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देता येत नसल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र सरकारचं हे कारण साफ चुकीचं आहे. मुळात जरी बँकांची परिस्थिती वाईट असली तरी सर्व बँकांचं मिळून जे आॅपरेटीव्ह प्राॅफिट येत ते प्राॅफिट खूप मोठं असून त्यातून कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देता येईल. मुळात या प्राॅफिटमधून कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणं हा त्यांचा न्याय हक्क आहे. कारण कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मेहनीतीतूनच हे प्राॅफिट मिळत असल्याचं उटगी यांनी सांगितलं.



कर्जबुडव्यांसाठी वापर

हे आॅपरेटीव्ह प्राॅफिट कर्मचाऱ्यांना मिळण्याऐवजी कर्जबुडव्यांच्या कर्जाचा बोजा चुकवण्यासाठी वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप उटगी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. देशभरातील बँकांच्या डोक्यावर ९ लाख कोटी बुडीत कर्जाचा बोजा आहे. तो चुकवण्यासाठी आॅपरेटीव्ह प्राॅफिटचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ''कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे'', असं म्हणत कर्मचारी-अधिकारी वेतनवाढीवर ठाम आहेत.

या संपानंतरही वेतनवाढीची मागणी मान्य झाली नाही, तर पुढे आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पण वेतनवाढीच्या मुद्दयावर कर्मचारी ठाम असणार असून पुढंही हा मुद्दा रेटण्यात येणार असल्याचंही उटगी यांनी सांगितलं.



हेही वाचा-

तोटा झाला मोठा!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा