कर्जावरील ईएमआय ३ महिन्यांसाठी स्थगित करा, आरबीआयचं बँकांना आवाहन

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून कर्जदारांना कर्जाचा हप्ता भरण्यास 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असं आवाहन आरबीआयने सर्व बँकांना केलं आहे. 3 महिन्यांच्या कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून  कर्जाचा मासिक हप्ता परस्पर कापू नये, असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आवाहनाला बँकांनी प्रतिसाद दिल्यास कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

कर्जदारांना कर्जफेडीसाठी 3 महिने अतिरिक्त कालावधी देण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले आहे. यामुळे उशिराने कर्जाचे हप्ते भारणाऱ्या ग्राहकांना कोणतेही व्याज किंवा दंडात्मक शुल्क भरावे लागणार नाही. ही सुविधा केवळ मुदतीची कर्जे घेतलेल्या (Term loan ) कर्जदारांसाठी असून क्रेडीट कार्ड धारकांसाठी नाही.

१ मार्च २०२० पर्यंत ज्यांची कर्जफेड बाकी आहे, अशा ग्राहकांना ईएमआय भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. कर्जदारांना ईएमआय भरण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यास रिझर्व्ह बँकेने बँकांना परवानगी दिली आहे. यात सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्त संस्था, ग्रामीण बँका यांना ही सुविधा कर्जदारांना उपलब्ध करता येईल. यासाठी कर्जदारांचे तीन महिन्यांचे हप्ते , त्यांचा परतफेडीचा नवा कालावधी तसेच त्यांची मुदत याची फेररचना बँकांना करावी लागेल, असं आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

आरबीआयच्या आवाहनाला बँकांनी प्रतिसाद दिल्यास तीन महिन्यांपर्यंत कोणाच्याही खात्यातून ईएमआय कापला जाणार नाही.  ईएमआय माफ केले नसून केवळ तीन महिन्यांसाठी स्थगित केले आहेत. जर तुमचे कर्ज २०२१ मधील जानेवारीमध्ये संपणार असेल तर तेच कर्ज आता एप्रिल २०२१ मध्ये संपेल. याचा कर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम होणार नाही.   दरम्यान, बँकांनी व्याजदर कपातीचा लाभ आणि कर्जफेडीस मुदतवाढ तातडीने लागू करून कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी फिक्की या प्रमुख औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. संगीता रेड्डी यांनी केली आहे.


हेही वाचा -

कर्जे होणार स्वस्त, आरबीआयकडून रेपो दरात कपात

लॉकडाऊनमुळे जीडीपी २.५ टक्के राहण्याची शक्यता

बिग बझार देणार होम डिलिव्हरी, 'हे' आहेत फोन क्रमांक


पुढील बातमी
इतर बातम्या