दिलासादायक! मुंबईतील कंटेन्मेंट झोन्स २२ टक्क्यांनी घटले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील कोरोनाबाधित (COVID-19) रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील कंटेन्मेंट झोन मात्र चक्क २२ टक्क्यांनी घटले आहे. तर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या मात्र वाढली आहे. ही ९ जून ते २८ जुलै २०२० दरम्यानची आकडेवारी आहे. सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या १८,९५७ वरून ३०,७८१ वर जाऊन पोहोचली आहे.

कडक लाॅकडाऊन आणि कंटेन्मेंट झोनमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रहिवाशांच्या वावरावर कमालिच्या मर्यादा आल्या होत्या. परंतु लाॅकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आल्याने लोकांचा वावरही पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे, परिणामी कोरोनाच्या विषाणूचा फैलाव होत आहे. उदा. पूर्वी कुठल्याही सोसायटीच्या आवारात किंवा इमारतीत बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता. पाहुणे, कुटुंबिय वा इतर व्यक्तींची तपासणी व्हायची. परंतु आता तसं काहीही न होता सोसायटीत मुक्तपणे लोकं ये-जा करत आहेत, असं मत एका महापालिका अधिकाऱ्याने व्यक्त केलं.

हेही वाचा - धारावी पॅटर्नची वॉशिंग्टन पोस्टकडून दखल, पालिकेचं केलं कौतुक

कोरोनाचा विषाणू सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवाशांमार्फत आपल्या देशात आला. त्यानंतर तो स्थानिक चालक किंवा त्यांचे निकटवर्तीय यांच्याद्वारे झोपडपट्टीत पसरला. पुढं झोपडपट्टीतून हाऊसिंग सोसायटी, उच्चभ्रूंच्या इमारतीत गेला. झोपडपट्टी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे इथं या विषाणूचा फैलाव जलदगतीने झाला असला, तरी आता या परिसरातील रहिवाशांमध्ये अँटीबाॅडी तयार झाल्या आहेत किंवा होत आहेत, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, असं राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील सदस्य डाॅ. शशांक जोशी यांनी सांगितलं. 

मुंबईतील किती टक्के रहिवाशांमध्ये कोरोना विषाणूशी लढण्याकरीता आवश्यक अँटीबाॅडी तयार झाल्या आहेत, हे तपासण्याकरीता मुंबई महापालिकेने निती आयोग आणि टाटा फंडामेंटल रिसर्च सोबत मिळून ३ आॅगस्टपासून सेराेलाॅजिकल सर्वेक्षण सुरू केलं आहे.  

या सेराेलाॅजिकल सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेच्या आर नाॅर्थ, एम वेस्ट आणि एफ नाॅर्थ या वाॅर्डातील ६,९३६ लोकांपैकी ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबाॅडी विकसित झाल्याचं आढळून आलं आहे. तर १६ टक्के रहिवासी कोविड-१९ अँटीजन असल्याचं पुढं आलं आहे.

मुंबई महापालिकेने मोठ्या प्रयत्नाने झोपडपट्टीतील कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात यश मिळवलं असलं, तरी हाऊसिंग सोसायटीमध्ये मात्र कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. यामुळे या रहिवाशांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. 

हेही वाचा - मुंब्रा झाला ‘हाॅटस्पाॅट’मुक्त!

पुढील बातमी
इतर बातम्या