धोकादायक इमारती खाली करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावरून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना उच्च न्यायालयाने फैलावर घेताच त्यांनी लागलीच सर्व अधिकाऱ्यांना सूचना करून अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईत असलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी संबंधित इमारतीचे पदाधिकारी आणि रहिवासी यांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना शुक्रवारी इमारतींच्या विषयाबाबत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दुपारी अजोय मेहता हे न्यायालयासमोर उपस्थित राहिले. यावेळी न्यायालयाने महापालिका प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आयुक्त थेट महापालिका मुख्यालयात दाखल होत दुपारी बोलावलेल्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त तसेच विभाग प्रमुखांच्या बैठकीत धोकादायक इमारतींबाबत सूचना केल्या.

इमारतींची सद्यस्थितीइमारतींची संख्या
एकूण धोकादायक इमारती642
तोडलेल्या इमारती22
रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती120
न्यायप्रविष्ट इमारतींची प्रकरणे154
तांत्रिक सल्लागार समितीकडील प्रकरणे36
वीज-पाणी जोडणी खंडित केलेल्या इमारती154
प्राथमिक कार्यवाही सुरु असलेल्या इमारती156

यावेळी धोकादायक इमारतींबाबत त्यातील धोके स्थानिक लोकांना समजावून सांगावेत आणि जनप्रबोधनासाठी पालिकेच्या वतीने करण्यात येणारे पोस्टर्सही या इमारतींमध्ये लावण्यात यावेत, असे निर्देश दिले. त्यासाठी सर्व विभागांनी आपल्या भागात विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा - 

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर गणपती विसर्जनानंतर...

पुढील बातमी
इतर बातम्या