झाडांच्या कत्तलीवरून दादरमध्ये पर्यावरणवादी अन् पालिकेत जुंपली

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून गेल्या ३ दिवसांपासून दादर पश्चिमेकडील डी. एल. वैद्य रोडवरील ५१ झाडांची मुळापासून छाटणी करण्याचं काम सुरू आहे. त्यानुसार गुरूवारी वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचारी-अधिकारी वृक्ष छाटणीसाठी आले असता काही पर्यावरणवाद्यांनी याठिकाणी धाव घेत वृक्ष छाटणीच्या कामाला जोरदार विरोध केला. वृक्ष प्राधिकरणाकडून झाडांची सुरू असलेली छाटणी बेकायदेशीर असून तो गुन्हा असल्याचा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत दुपारी हे काम थांबवलं.

बघा, 'अशी' कापली झाडं

झाड उन्मळून पडलं

शनिवारी रात्री पाऊस पडत असताना डी. एल. वैद्य रोडवरील एका झाडाखाली आडोशाला उभ्या असलेल्या ४ जणांवर झाड उन्मळून पडलं. यात चारही जण जखमी झाले. या घटनेची महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणानं गंभीर दखल घेत अशा घटना रोखण्यासाठी या रोडवरील झाडांसह दादर पश्चिम परिसरातील अन्य झाडांची मुळापासून छाटणी करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरणानं घेतला आहे. त्याप्रमाणं डी. एल. वैद्य मार्गावरील झाडांच्या छाटणीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली.

हा कुठला न्याय?

मात्र महापालिकेच्या या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. झाडं कोसळतात, उन्मळतात म्हणून सरसकट सर्वच झाडांचा बळी देणं हा कुठला न्याय आहे असं म्हणत पर्यावरणवादी कुणाल बिरवडकर आणि श्रद्धा बिरवडकर यांच्यासह अन्य पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे.

पोलिसांत तक्रार

गुरूवारी सकाळी वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचारी-अधिकारी झाडांची छाटणी करायला येणार म्हणताच पर्यावरणवाद्यांनी डी. एल. वैद्य रोडवर धाव घेत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काम बंद करण्यास नकार देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रारही या पर्यावरणवाद्यांनी केली.

बेकायदेशीर वृक्षछाटणी

या तक्रारीनंतर मात्र वृक्ष प्राधिकरणानं दुपारी दोनच्या सुमारास काम थांबवल्याची माहिती पर्यावरणवादी श्रद्धा बिरवडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. वृक्ष प्राधिकरणाच्या एका अहवालानुसार दादरमधील सर्व रोडवरील धोकादायक झाडांची १८ इंचापर्यंतच छाटणी करावी असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं असताना चक्क ५० इंचापर्यंत, अगदी झाडांची मुळासकट छाटणी करत झाडांचा बळी घेतला जात आहे. हे बेकायदेशीर कृत्य असून हा गुन्हा असल्याचं म्हणत बिरवडकर यांनी हे काम वृक्ष प्राधिकरणानं त्वरीत थांबावं अशी मागणी केली आहे.

मुद्दा चिघळण्याची शक्यता

हे काम असंच सुरू राहिलं तर याविरोधात आम्ही कायदेशीर लढा देऊ, असा इशाराही यावेळी पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. तर आजच्या दिवशी हे काम थांबवलं असलं तरी पुन्हा वृक्ष प्राधिकरणाकडून काम सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता झाडांच्या मुळापासून छाटणीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा-

महिन्याभरात नवा वृक्ष अधिकारी नेमा! ठाणे महापालिकेला न्यायालयाचा दणका

वांद्र्यातील ४९ झाडांना आतून लागली किड


पुढील बातमी
इतर बातम्या